PCMC : कामगार कल्याण मंडळाच्या वतीने "लहान कुटुंब - सुखी कुटुंब" सन्मान सोहळा संपन्न

 


पिंपरी चिंचवड – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, उद्योगनगरच्या वतीने लोकसंख्या दिनानिमित्त "एक अपत्य किंवा दोन मुली अपत्यावर कुटुंब नियोजन" केलेल्या पाच कामगार कुटुंबांचा सन्मान सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन मंडळाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मा. मनोज पाटील यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. ईश्वर वाघ (सचिव, राष्ट्रीय कामगार संघ) होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कामगार नेते किरण देशमुख, रवींद्र घाडगे (अध्यक्ष, प्रीमियम ट्रान्समिशन लि.), कामगार भूषण डॉ. मोहन गायकवाड आणि गुणवंत कामगार अण्णा जोगदंड यांची उपस्थिती लाभली होती.

सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, “छोटं कुटुंब हेच सुखी जीवनाचे सूत्र आहे. आज भारताची लोकसंख्या १४६ कोटींच्या घरात पोहोचली असून ती संपूर्ण जगाच्या लोकसंख्येच्या १८ टक्के आहे. ही वाढ चिंताजनक असून पर्यावरण आणि राष्ट्रीय विकासासाठीही अडथळा ठरू शकते.”


प्रमुख पाहुणे किरण देशमुख यांनी नमूद केले की, “देशाची लोकसंख्या संतुलित ठेवण्यासाठी कुटुंब नियोजन गरजेचे आहे. मुलगा किंवा मुलगी असा भेद न करता निर्णय घ्यावा.”

कार्यक्रमाचे अध्यक्ष ईश्वर वाघ म्हणाले, “संघटित कामगारांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले असून असंघटित कामगारांचे प्रमाण वाढते आहे. ही स्थिती चिंतेची बाब आहे.”

केंद्र संचालक प्रदीप बोरसे यांनी सांगितले की, “कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील विविध केंद्रांमध्ये लोकसंख्या दिन साजरा केला जात असून कुटुंब नियोजन करणाऱ्या कुटुंबांचा गौरव केला जातो, ही बाब भूषणावह आहे.”

प्रबोधन दिंडीत सहभागी झालेल्या कामगार व कुटुंबीयांना प्रमाणपत्रांचे वाटप मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुभाष चव्हाण यांनी एक भावनिक कविता सादर करून कार्यक्रमात रंग भरला.

यावेळी योगेश नागवडे (CIE), प्रवीण आरबोले (SFS ग्रुप इंडिया), चंद्रकांत साळुंखे (PMPL), मंगेश भोसले (कैलास वाहन प्रा. लि.), संतोष अडचुले (टाटा मोटर्स) यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि ५००० रुपये रोख देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये शंकर नाणेकर, सुभाष चव्हाण, तानाजी एकोंडे, राजेश हजारे, कल्पना भाईगडे, मोहम्मद शरीफ मुलाणी, बाळासाहेब साळुंखे, हनुमंत जाधव, संदीप रांगोळे, मच्छिंद्र कदम, प्रकाश चव्हाण, शिवराज शिंदे, देवकर दत्तात्रय यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे संयोजन केंद्र संचालक प्रदीप बोरसे, सुनील बोराडे, संदीप गावडे, अनिल कारळे आणि अविनाश राऊत यांनी केले. सूत्रसंचालन सुनील बोराडे यांनी तर आभारप्रदर्शन प्रदीप बोरसे यांनी केले.


थोडे नवीन जरा जुने