Pune : काॅम्रेड व्ही. एस. अच्युतानंदन यांना क्रांतिकारी अभिवादन!

 


पुणे : केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि सामाजिक समतेचे प्रखर पुरस्कर्ते काॅ. व्ही. एस. अच्युतानंदन यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय डाव्या, पुरोगामी चळवळीतील एक महत्त्वाचा, जाज्वल्य आणि अस्सल आवाज हरपला आहे.

जातिअंताच्या लढ्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले. त्यांनी शोषित-वंचित समाजासाठी, विशेषतः दलित व मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी वेळोवेळी ठाम भूमिका घेतली. ब्राह्मणवाद, सामाजिक विषमता आणि जातीच्या बंधनाविरोधात त्यांनी लढा दिला. केरळमध्ये दलित-आदिवासींच्या जमीनहक्कांच्या प्रश्नांवर त्यांनी लढे उभारले, आणि यासाठी सत्तेत असताना तसेच विरोधी पक्षात राहूनही त्यांनी संघर्ष सुरुच ठेवला.

त्यांनी केवळ वर्ग संघर्षाच्या चौकटीत न राहता जातिभेदाचा सवाल स्वतंत्रपणे मांडला, ही त्यांची डाव्या राजकारणातील प्रगल्भता दर्शवते. त्यांच्या जाण्याने एका क्रांतिकारक, स्पष्टवक्त्या आणि सामाजिक न्यायाच्या खऱ्या लढवैय्याची हानी झाली आहे.

स्वत: एक दलित समुदायातील असलेल्या काॅ अच्युतानंदनांनी केवळ वर्ग संघर्ष नव्हे तर जातीभेदाच्या विरोधातही स्पष्ट भुमिका घेतली. त्यांनी दलितांचे प्रश्न कम्युनिस्ट चळवळीच्या केंद्रस्थानी आणण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला. त्यांची भूमिका, त्यांचा प्रगल्भ दृष्टिकोन आणि सामाजिक न्यायासाठीचा लढा ही पुढील पिढ्यांसाठी एक प्रेरणा ठरेल.

क्रांतिकारी श्रद्धांजली!

अखेरचा जयभीम... लाल सलाम!

डाॅ. किशोर खिल्लारे, पुणे

थोडे नवीन जरा जुने