बँकेत दिलेला चेक आता काही तासांत होणार क्लिअर; रिझर्व्ह बँकेची नवी प्रणाली ४ ऑक्टोबरपासून लागू

 


मुंबई (वर्षा चव्हाण) : चेक क्लिअर होण्यासाठी लागणाऱ्या दोन-तीन दिवसांच्या प्रतिक्षेला आता पूर्णविराम मिळणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे ४ ऑक्टोबर २०२५ पासून चेक क्लिअरिंगसाठी नवी जलद प्रक्रिया सुरू होत आहे. या नव्या प्रणालीमुळे बँकेत दिलेले चेक आता काही तासांतच वटवले जातील.

आरबीआयने ही नवी प्रणाली दोन टप्प्यांत लागू करण्याचे ठरवले आहे:

🔹 पहिला टप्पा: ४ ऑक्टोबर २०२५ ते २ जानेवारी २०२६

1.सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत बँकेत दिलेले चेक लगेच स्कॅन करून क्लिअरिंग हाऊसकडे पाठवावे लागतील.

2.संबंधित बँकेने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चेक मंजूर/नामंजूर असल्याचे कळवणे बंधनकारक आहे.

3.वेळेत उत्तर न दिल्यास, चेक ‘आपोआप मंजूर’ झाल्याचे गृहीत धरले जाईल.

🔹 दुसरा टप्पा: ३ जानेवारी २०२६पासून पूर्ण अंमलबजावणी

1.चेक मिळाल्यानंतर जास्तीत जास्त तीन तासांत मंजुरी देणे अनिवार्य असेल.

उदाहरणार्थ, सकाळी १० ते ११ दरम्यान प्राप्त चेकसाठी दुपारी २ वाजेपर्यंत निर्णय घ्यावा लागेल.

2.वेळेत मंजुरी न दिल्यास चेक मंजूर मानून त्याची सेटलमेंट होईल.

3.सेटलमेंटनंतर ग्राहकाच्या खात्यात पैसे त्वरित, पण कमाल एका तासात जमा केले जाणे बंधनकारक असेल.

या निर्णयामुळे ग्राहकांना जलद सेवा मिळणार असून, डिजिटल युगातील बँकिंग व्यवहार अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होणार आहेत.

थोडे नवीन जरा जुने