PCMC : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – आयुक्त शेखर सिंह

 


गणेशोत्सव तयारीसंदर्भातील महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत विसर्जन घाट नियोजन, वाहतूक, स्वच्छता व सुरक्षेसह विविध उपाययोजनांबाबत देण्यात आले निर्देश

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - यंदा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत हा उत्सव साजरा होत असून, या अनुषंगाने शहरातील मुख्य मिरवणूक मार्ग, विसर्जन घाट तसेच इतर ठिकाणी वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा यांसह आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून उत्सव मूर्तींचे विसर्जन करण्यात येणाऱ्या घाटांवर योग्य नियोजन करावे, असेही आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

आगामी गणेशोत्सव व गणेशमूर्ती विसर्जन अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिका, पोलीस प्रशासन, महावितरण आदी विभागांची आढावा बैठक आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात झालेल्या या बैठकीला सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, शहर अभियंता मकरंद निकम, सह आयुक्त मनोज लोणकर,  मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे,  मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सह शहर अभियंता बापू गायकवाड, देवन्ना गट्टुवार, उपायुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे, किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, अश्विनी गायकवाड, अजिंक्य येळे, अमित पंडित, तानाजी नरळे, किशोर ननवरे, पूजा दुधनाळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांच्यासह पोलीस निरीक्षक अमित डोळस, महावितरणचे कार्यकारी अधिकारी अतुल देवकर, सोमनाथ मुंडे यांच्यासह महापालिका, पोलीस प्रशासन आणि महावितरणचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, ‘गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी येथील मुख्य विसर्जन मार्गासह विसर्जन घाट मार्गावरील खड्डे बुजवण्यास प्राधान्य द्या. या मार्गांवरील धोकादायक सर्व्हिस वायर, केबल शिफ्ट करण्यासह विद्युत विषयक आवश्यक कामे करण्यात यावीत. विसर्जन घाटावर आवश्यक तेवढे कृत्रिम विसर्जन हौद तयार करा. पीओपी उत्सवमूर्ती व शाडू मातीच्या मूर्तीच्या विसर्जनाची वेगळी व्यवस्था करा. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सर्व घाटांवर गणेशमूर्ती संकलनाचे व्यवस्थापन करा. विसर्जन केलेल्या उत्सव मूर्ती घेऊन जाण्यासाठी वाहनांचे योग्य नियोजन करा, तेथे आवश्यक तेवढे मनुष्यबळ उपलब्ध करून द्या. सर्व घाटांवर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जीवरक्षकांसह जलद प्रतिसाद पथके तैनात करावीत, अग्निशमन जवान आणि आपदा मित्र यांची नियुक्ती करावी, असे निर्देश आयुक्त सिंह यांनी दिले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आठ प्रभागांतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी आढावा घेतला. त्यानंतर आयुक्त सिंह म्हणाले,  ‘गणेशमूर्ती विसर्जनाच्या सर्व ठिकाणी सक्षम वैद्यकीय पथकासह सुसज्ज रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात यावी, मिरवणूक मार्गावर तसेच विसर्जन घाटांवर पुरेशी विद्युत व्यवस्था करावी, गणेशोत्सव कालावधीत संपूर्ण शहरात स्वच्छतेची विशेष मोहीम राबवावी, स्थानिक पातळीवर सेवाभावी संस्था व गणेश मंडळे यांच्याशी समन्वय ठेवावा, विसर्जन तसेच मिरवणूक मार्गावरील धोकादायक व अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी, विसर्जनाच्या ठिकाणी मिरवणूक संपेपर्यंत स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करावी, मिरवणूक मार्गावर आणि शहरातील गर्दीच्या ठिकाणी मोकाट जनावरे फिरणार नाहीत यासाठी पथकांची नियुक्ती करून कार्यवाही करावी,’ असे निर्देशही आयुक्त सिंह यांनी दिले.

यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर यांनी दिली. महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे यांनी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महापालिकेने केलेल्या तयारीचे सादरीकरण केले.

.....

मंडप परवानगी अर्ज तातडीने निकाली काढा

पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळांना विविध परवाने उपलब्ध करून देण्यासाठी सर्व ८ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एकखिडकी कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,  ‘सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी गणेश मंडळांना मंडप परवाने देताना मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तसेच शासनाच्या आदेशांचे पालन करावे. अनधिकृत मंडप उभारले जाणार नाहीत याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच मंडप परवानगीसाठी आलेले अर्ज तातडीने निकाली काढावेत. पुढील दोन दिवसांत अशा अर्जांची संख्या वाढू शकते. अशा परिस्थितीत पोलीस प्रशासनासोबत समन्वय साधून परवाना देण्याबाबत कार्यवाही करावी,’ असेही आयुक्त शेखर सिंह म्हणाले.

थोडे नवीन जरा जुने