अहमदाबाद : भारत आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधून एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. त्यांनी व्यापाऱ्यांना आश्वासन दिलं आहे की, कितीही दबाव आला तरी त्यावर मार्ग निघेल.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज जगात प्रत्येकजण केवळ आपल्या आर्थिक स्वार्थासाठी राजकारण करत आहे, हे आपण पाहत आहोत. अहमदाबादच्या भूमीतून मी माझ्या लघु उद्योजक, छोट्या दुकानदार, शेतकरी आणि पशुपालकांना सांगू इच्छितो की, मी गांधींच्या भूमीतून बोलतो आहे. देशातील लघु उद्योजक, शेतकरी, पशुपालक – तुमचा हित हा मोदींसाठी सर्वात महत्वाचा आहे. माझं सरकार तुमचं नुकसान होऊ देणार नाही. दबाव कितीही आला तरी आपण तो सहन करण्याची ताकद वाढवत राहू.
अमेरिकेने जून २०२५ मध्ये भारतीय स्टील आणि अॅल्युमिनियमवर २५ टक्क्यांवरून थेट ५० टक्के शुल्क लावले होते. त्यानंतर सर्व भारतीय उत्पादनांवर २५ टक्क्यांचा टॅरिफ लावण्यात आला. आणि ६ ऑगस्टला पुन्हा एकदा रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेने आणखी २५ टक्के टॅरिफ वाढवून पेनल्टी लावली. त्यामुळे भारत-अमेरिका व्यापार तणाव अधिकच वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमचं सरकार लघु उद्योजक, शेतकरी, पशुपालक यांचं कधीच अहित होऊ देणार नाही.
ते पुढे म्हणाले की, आज गुजरातच्या भूमीवर प्रत्येक प्रकारच्या उद्योगाचा विस्तार होत आहे. संपूर्ण गुजरातला अभिमान वाटतोय की आपलं राज्य आता मॅन्युफॅक्चरिंग हब बनलं आहे. देश-विदेशातील मोठ्या कंपन्या इथे फॅक्टऱ्या उभारत आहेत. आता इलेक्ट्रिक वाहन उत्पादनासाठीही गुजरात एक मोठं केंद्र बनत आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमचं सरकार GST मध्ये सुधारणा करत आहे आणि दिवाळीपूर्वी तुम्हाला एक मोठं गिफ्ट मिळणार आहे. GST सुधारणा लघु उद्योगांसाठी उपयुक्त ठरणार असून अनेक वस्तूंवरील कर कमी होणार आहे. यंदाच्या दिवाळीत व्यापार वर्ग असो किंवा सर्वसामान्य कुटुंब – सगळ्यांना दुहेरी आनंद मिळणार आहे.
'मेड इन इंडिया' खरेदी करा – मोदींची सणांपूर्वी जनता आणि व्यापाऱ्यांना खास विनंती
पंतप्रधान मोदींनी सोमवारी एका कार्यक्रमात जनतेला 'मेड इन इंडिया' वस्तू खरेदी करण्याचं आवाहन केलं. त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं की, सरकार लघु उद्योजक, शेतकरी आणि पशुपालक यांच्या पाठीशी उभी आहे आणि त्यांचं नुकसान होऊ देणार नाही.