पिंपरी चिंचवड - "आजची बदलती जीवनशैली ही केवळ व्यक्तीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण कुटुंबसंस्थेवर प्रभाव टाकत आहे. विशेषतः हिंदू कुटुंबसंस्था अनेक आव्हानांना सामोरी जात आहे," असे मत सामाजिक कार्यकर्त्या नयना सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन येथे आयोजित "बदलती जीवनशैली व हिंदू कुटुंबातील आव्हाने" या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.
सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या भाषणात शहरीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिरेक, सामाजिक माध्यमांचा प्रभाव, नातेसंबंधातील दुरावा, आणि परंपरागत संस्कारांचा अभाव या मुद्द्यांवर सखोल प्रकाश टाकला.
त्यांनी सांगितले, "पूर्वीची संयुक्त कुटुंबपद्धत आता ढासळताना दिसत आहे. त्यामुळे वृद्ध, लहान मुले आणि स्त्रिया अधिक असुरक्षित आणि भावनिकदृष्ट्या एकाकी होत आहेत."
त्यांनी पुढे सांगितले की, "परिवारातील संवाद कमी होणे, मूल्यांचे क्षरण, आणि व्यक्तिकेंद्रित जीवनशैली यामुळे कुटुंबातील सुसंवाद तुटत आहे. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी पारंपरिक मूल्यांवर आधारित आधुनिक जीवनशैलीची पुनर्रचना आवश्यक आहे."
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत मातेच्या पूजनाने उद्घाटन करण्यात आले. यावेळी नयना सहस्त्रबुद्धे, विश्वनाथन नायर, अश्विनी अनंतपुरे, वैदेही पटवर्धन व अनघा कानडे यांची उपस्थिती होती.
अश्विनी अनंतपुरे यांनी प्रास्ताविक केले, शितल गोखले यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. पल्लवी कोंडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर समृद्धी पैठणकर यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले, ज्यात श्रोत्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. श्रावणमासाच्या पार्श्वभूमीवर हळदीकुंकू समारंभ आयोजित करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.