PCMC : पिंपरी-चिंचवडमधील ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ पुतळ्याचे मुकूट पूजन- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वांत उंच पुतळा



- भाजपा आमदार महेश लांडगे यांची संकल्पना स्वप्नपूर्ती दृष्टीक्षेपात

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा, ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’चे मुकूट पूजन करण्यात आले. शंभूराजांचे मुकूट दर्शन होताच शिव-शंभूप्रेमींच्या जय शिवाजी…जय शंभुराजे… अशा गर्जना आणि मंत्रोच्चाराने संपूर्ण मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसर दुमदुमला.

भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून मोशी-बोऱ्हाडेवाडी येथे जगातील सर्वांत उंच ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्याग, समर्पण आणि बलिदानाची प्रेरणा असलेल्या या पुतळ्याची उंची १४० फूट असून, चौथऱ्याची उंची ४० फूट आहे. या पुतळ्याच्या मुकूट पुजनासाठी शिव-शंभुप्रेमींनी गर्दी केली होती.

तसेच, पुतळ्याच्या परिसरात हंबीरराव मोहिते यांचा १० फूट उंच पुतळा, १६ सरदार आणि मावळ्यांचे पुतळे, ओपन एअर थिएटर, ब्राँझ म्यूरल्स तसेच शंभुराजांची गाथा ऐकण्यासाठी स्क्रीनसह हॉलोग्राफिक प्रेझेंटेशनची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, महाराजांच्या पुतळ्याचे काम दिल्ली येथील कार्यशाळेत करण्यात आले. त्याचे भाग या ठिकाणी कार्यशाळेत आणले आणि त्याची जोडणी करण्याचे काम सुरू आहे. या पुतळ्याद्वारे छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य आणि कार्याची गाथा लोकांपर्यंत पोहोचवली जाणार असून शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पुतळ्याचा चौथरा आणि बांधणीचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यावर आमदार लांडगे यांचे कटाक्षाने लक्ष आहे. पुतळ्याचे काम भव्य-दिव्य करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यातील शिव-शंभू प्रेमींसाठी हा ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.


प्रतिक्रिया :

“ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे अद्वितीय शौर्य आणि त्याग आजही भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ फक्त एक पुतळा नाही, तर राष्ट्रभक्ती आणि त्याग-समर्पणाचा स्त्रोत आहे. जगातील सर्वांत उंच असा हा पुतळा पिंपरी-चिंचवडकरांसाठी आणि तमाम शिव-शंभू प्रेमींसाठी गर्व आणि अभिमानाची बाब आहे. ही शंभुसृष्टी आपली संस्कृती, इतिहास आणि वारशाला उजाळा देणारा दीपस्तंभ ठरेल.”

- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे


थोडे नवीन जरा जुने