चिंचवड येथील बीएसएनएल कार्यालयावर कष्टकरी कामगारांचे आंदोलन
निगडी प्राधिकरण दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबियांना १० लाखाचे अर्थसहाय्य द्या
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : स्वातंत्र्यदिनी निगडी प्राधिकरण येथे बीएसएनएलच्या ऑप्टिकल फायबरचे काम करणाऱ्या निष्पाप ३ कष्टकरी कामगारांचा मृत्यू झाला. याला ६ दिवस उलटले तरी गुन्हा नाही, मदत नाही यामध्ये बीएसएनएल विभाग, जिल्हा अधिकारी, कामगार विभाग व पोलीस प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून प्रशासकीय यंत्रणा एकमेकावर जबाबदारी ढकलत आहेत, याप्रकरणी आज कष्टकरी कामगारांची जबाबदारी ढकलायची नाय..! म्हणत कष्टकरी संघर्ष महासंघाच्या तर्फे कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वात कामगार आक्रोश आंदोलन करण्यात आले.
बीएसएनएल कार्यालय चिंचवड येथे झालेल्या आंदोलनात राज्य संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, उपाध्यक्ष राजेश माने, महिलाअध्यक्षा माधुरी जलमूलवार, मनपा सदस्य सलीम डांगे, किसन भोसले, आयोजक संभाजी वाघमारे, लाला राठोड, रज्जाक शेख, नंदा जाधव, मनोज यादव, नंदू आहेर, सहदेव होनमने, सुनंदा लोंढे, रुक्मिणी जाधव, मनीषा हाके, बाबा मारणे, सय्यद अली, अशोक पगारे, मुमताज शेख, सुनिता पोतदार, सलीम हवालदार, शरद कोळी, अंबालाल सुखावल यांचे सह पुणे जिल्ह्यातील विविध कामगारांनी सहभाग नोंदवला.
नखाते म्हणाले की, देशवासीयांसाठी महत्वाचा स्वातंत्र्य दिन म्हणून १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त सुट्टी असतानाही कामगारांना चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळी निगडी प्राधिकरण येथे कामास लावण्यात आले व त्यांना सुरक्षिततेची साधने न देता मदत कक्ष अथवा आपत्कालीन परिस्थितीत मदत करणारी व्यवस्था सोबत न घेता ड्रेनेज लाईनमध्ये सोडल्यानंतर मृत्यू होऊ शकतो याची माहिती असताना सुद्धा अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे ऑप्टिकल फायबर केबल, टाकणे दुरुस्तीचं काम करण्यास लावले. एक कामगार कामासाठी आत गेल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटत होते म्हणून त्यांनी आवाज दिला म्हणून दुसरा आणि नंतर तिसरा गेला असे एक एक करून तिघांचा स्वातंत्र्यदिनी भयावह दुर्दैवी अंत झाला. यात लखन धावारे, दत्ता होनाळे, साहेबराव गिरशेटे हे निष्पाप कामगार मृत पावले आहेत.
बिराजदार म्हणाले की, सर्व घडले आहे अक्षम्य चुकामुळे व बेजबाबदारपणे सुरक्षिततेची साधने न मिळाल्यामुळे यात दोषी असणारे संबंधित ठेकेदार व बीएसएनएलचे यातील दोषी अधिकारी, यांच्या चुकांमुळे, दुर्लक्षामुळे झाले आहे म्हणून यातील संबंधित सर्व दोषीवर मनुष्यवधाचा गुन्हा तसेच इतर कडक गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. यात बाबासाहेब वाघ या कामगाराने कार्यतत्परता दाखवून आरडाओरड केली व ते ड्रेनेजमध्ये नलिकेमध्ये उतरले नाहीत म्हणून त्यांचा जीव वाचला.
बारवकर म्हणाले की, अशा घटना वारंवार घडत आहेत यावर योग्य ती दखल शासन, कामगार विभाग, पोलीस प्रशासन, महानगरपालिका यांनी सुरक्षाबाबत योग्य ती कठोर पावले उचलण्याची गरज आहे. दोषीवर गुन्हे दाखल करून कडक शासन करावे तसेच मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये अर्थसहाय्य करावे.
कामगारांच्या सुरक्षेबाबत व सामाजिक सुरक्षाबाबत कष्टकरी कामगारांनी मोठ्या घोषणा दिल्या. आंदोलन स्थळी येऊन बीएसएनएलचे अधिकारी डी पी शिंदे, डेप्युटी जनरल मॅनेजर, बीएसएनएल चिंचवड यांचे सह इतर अधिकारी यांनी येऊन निवेदन स्वीकारले. यावेळी यावर योग्य ती कारवाई करू तसेच वरिष्ठांना याबाबत अहवाल पाठवू असे त्यांनी आश्वासित केले.