आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे ११ ऑगस्ट रोजी दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात १२ महिला भाविकांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले. या हृदयद्रावक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांचेकडुन ना.एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार तत्काळ पुढाकार घेत पीडित कुटुंबांना आर्थिक मदत दिली आहे. नीलमताई गोर्हे यांनी दिलेल्या या आर्थिक मदतीचे खेड तहसीलदार व स्थानिक अधिकारी, पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
खेड येथील दुर्घटनेनंतर डॉ. गोऱ्हे यांनी स्वतः मृतांच्या नातेवाईकांना भेटून सांत्वन केले. मोशी येथील साईनाथ हॉस्पिटल, खेडमधील सुश्रुत आणि शिवतीर्थ हॉस्पिटल्समध्ये जखमींची विचारपूस करत त्यांना धीर दिला. पापळवाडी येथे शोकाकुल कुटुंबांशी संवाद साधताना त्यांनी शासनाच्या सर्वतोपरी सहकार्याची हमी दिली होती. त्यानुसार तातडीने पावले उचलत आर्थिक मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले.
डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संवेदनशील आणि त्वरित हस्तक्षेपामुळे पीडितांना स्वनिधीतून केवळ आर्थिक मदतच नाही, तर मानसिक आधारही मिळाला. त्यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या या उपाययोजनांनी शासनाची संवेदनशीलता आणि कर्तव्यनिष्ठा दिसून येते. कुंडेश्वरच्या या दु:खद घटनेत गमावलेल्या जीवांना परत आणता येणार नाही, परंतु डॉ. गोऱ्हे यांच्या प्रयत्नांमुळे पीडित कुटुंबांना आर्थिक स्वरुपात दिलासा आणि आधार मिळाला आहे.
सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना
डॉ. गोऱ्हे यांनी राजगुरुनगर येथे तातडीची शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अपघातस्थळी धोकादायक वळणावर संरक्षक भिंत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ संरक्षक भिंत बांधण्याचे आणि अन्य सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या कारवाईमुळे भविष्यातील संभाव्य अपघातांना आळा बसेल असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.