पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - "फक्त स्वप्न बघू नका, त्यासाठी कृती करा," असा संदेश देत प्रसिद्ध उद्योजक अमरीश कक्कड यांनी युवकांना विकसित भारतासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी अमरीश कक्कड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमात विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सैनिकी वेशभूषेत नेत्रदीपक परेड, बँड पथक सादर करून मानवंदना दिली. माजी सैनिक रमेश वराडे आणि एस.एम. भगवान उत्तेकर यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.
सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी "सायबर वॉरियर्स" पथकाने डॉ. हर्षिता वाच्छानी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर शपथ दिली.
कक्कड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “देशाच्या प्रगतीसाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पर्यावरण, स्वच्छता, तंत्रज्ञान, शिक्षण या प्रत्येक क्षेत्रात युवकांनी सजग आणि सक्रिय राहिले पाहिजे.”
संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी अध्यक्षीय भाषणात देशाच्या प्रगतीसाठी एकजूट आणि जबाबदारीची जाणीव या गोष्टी अत्यावश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुवर्णा गायकवाड, पाहुण्यांचा परिचय प्रा. मनीषा पाटील यांनी केला. आभारप्रदर्शन प्रा. पल्लवी चव्हाण यांनी मानले.