PCMC : जयगड सोसायटीचा अद्वितीय उपक्रम — ३० किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प स्वखर्चातून उभारणारी देशातील पहिली पंतप्रधान आवास योजना सोसायटी!


पिंपरी-चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) -पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या जयगड सोसायटीने (PMRDA अंतर्गत पंतप्रधान आवास योजना - PMAY) एक ऐतिहासिक पाऊल उचलत स्वखर्चातून आणि कोणतीही सरकारी अनुदान न घेता त्यांच्या इमारतीवर ३० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या उभारला आहे. स्वातंत्र्यदिनी या प्रकल्पाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संजीवन सांगळे (अध्यक्ष, चिखली-मोशी व पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशन) यांनी भूषवले. या वेळी सोसायटीचे अध्यक्ष हर्षद पाटील, सचिव सोमेश्वर त्रिंबके, तसेच सर्व संचालक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रकल्पामुळे सोसायटीला दरमहा वीजबिलात लक्षणीय बचत होणार असून, कार्बन उत्सर्जनात घट होऊन पर्यावरण पूरक उपक्रमास चालना मिळणार आहे. याबाबत बोलताना संजीवन सांगळे म्हणाले, "जयगड सोसायटीने उचललेले हे पाऊल म्हणजे पर्यावरण रक्षण, स्वावलंबन आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे."

ते पुढे म्हणाले, "पिंपरी–चिंचवडमधील इतर सोसायट्यांनीही अशा प्रकारच्या हरित उपक्रमातून प्रेरणा घ्यावी आणि सौरऊर्जा प्रकल्पांची अंमलबजावणी करावी. फेडरेशनमार्फत आम्ही हे जनजागृती अभियान राबवत आहोत."

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सोसायटीचे सचिव सोमेश्वर त्रिंबके यांनी केले तर आभार प्रदर्शन अध्यक्ष हर्षद पाटील यांनी केले.


प्रतिक्रिया:

पर्यावरणपूरक उपक्रमांची गरज
जयगड सोसायटीने दाखवलेली दिशा ही शाश्वत विकासाच्या दृष्टीने एक सकारात्मक पायरी आहे. नैसर्गिक स्रोतांचा समतोल वापर करत, सोसायटीने ऊर्जा स्वावलंबनाची चळवळ सुरू केली असून, भविष्यात इतर गृहनिर्माण प्रकल्पांसाठीही ती आदर्श ठरेल. त्यामुळे फेडरेशन मार्फत पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सोसायटी धारकांना आवाहन आहे की, आपण प्रत्येक सोसायटी मध्ये सौरऊर्जा प्रकल्प ही संकल्पना राबवावी.

- संजीवन सांगळे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन


थोडे नवीन जरा जुने