पंतप्रधान मोदींनी प्रचार केलेल्या प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप, वाचा काय आहे प्रकरण !

Prajwal-Revanna-who-was-campaigned-by-Prime-Minister-Modi-gets-life-imprisonment


Prajwal Revanna :
कर्नाटकातील हसन येथील माजी खासदार आणि जनता दल (सेक्युलर) पक्षाचे नेते तसेच माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा यांना विशेष न्यायालयाने लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले आहे. या प्रकरणाने कर्नाटकाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. रेवण्णा यांच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणातील व्हिडिओ पेन ड्राइव्हद्वारे समोर आल्याने या प्रकरणाची देशभरात चर्चा झाली.

एप्रिल 2024 मध्ये हसन येथील एका महिलेने प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध लैंगिक शोषण आणि बलात्काराची तक्रार दाखल केली होती. यानंतर कर्नाटक सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले. SIT च्या तपासात प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध चार लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. या तक्रारींमध्ये एका 47 वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेचा समावेश होता, या लैंगिक अत्याचार प्रकरणात रेवण्णा यांना दोषी ठरवण्यात आले.


या प्रकरणात पेन ड्राइव्हद्वारे प्रसारित झालेल्या कथित व्हिडिओमुळे मोठा गदारोळ झाला. या व्हिडिओमध्ये प्रज्वल रेवण्णा यांच्यासह अनेक महिलांचे व्हिडिओ आणि चॅट स्क्रीनशॉट्स असल्याचा दावा करण्यात आला होता. या व्हिडिओच्या प्रसारामुळे कर्नाटक महिला आयोगाने तातडीने कारवाईची मागणी केली होती. यानंतर कर्नाटक सरकारने 27 एप्रिल 2024 रोजी SIT स्थापनेचे आदेश दिले.


न्यायालयाचा निकाल


कर्नाटकातील विशेष न्यायालयाने प्रज्वल रेवण्णा यांना एका लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले. शनिवारी, 2 ऑगस्ट 2025 रोजी विशेष न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी रेवण्णा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच पीडित 47 वर्षीय महिलेला 7 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. हा निकाल कर्नाटकातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात महत्त्वाचा मानला जात आहे, कारण यामुळे माजी पंतप्रधानांच्या कुटुंबातील एका सदस्याला गंभीर शिक्षेचा सामना करावा लागला आहे.


प्रज्वल रेवण्णा यांचा पलायन आणि अटक


या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रज्वल रेवण्णाने एप्रिल 2024 मध्ये देश सोडला आणि जर्मनीला पळून गेला. त्याने बेंगलुरूहून फ्रँकफर्टला जाणारी फ्लाइट घेतली होती. मात्र, 31 मे 2024 रोजी जर्मनीहून परतल्यानंतर SIT ने त्यांना तात्काळ अटक केली. या अटकेनंतर त्यांच्याविरुद्धचा तपास अधिक गतीने पुढे गेला आणि पुराव्यांच्या आधारे त्यांना दोषी ठरवण्यात आले.


राजकीय परिणाम


प्रज्वल रेवण्णा हे जनता दल (सेक्युलर) आणि भाजप युतीचे उमेदवार होते. त्यांच्या या प्रकरणामुळे दोन्ही पक्षांना राजकीय अडचणींचा सामना करावा लागला आहे. विशेषतः हसन लोकसभा मतदारसंघात या प्रकरणाने निवडणूक प्रचाराच्या दिशा बदलल्या. लोकसभा निवडणूकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रज्वल रेवण्णाचा प्रचार देखील केला होता.


Prajwal-Revanna-who-was-campaigned-by-Prime-Minister-narendra-Modi-gets-life-imprisonment
थोडे नवीन जरा जुने