२१८ जणांनी रक्तदान करून श्री कसबा गणपती मंडळाची अभिनव सेवा परंपरा कायम
पुणे (क्रांतीकुमार कडुलकर) – पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळ आयोजित वार्षिक रक्तदान शिबिर यावर्षी मोठ्या उत्साहात पार पडले. प्रमुख पाहुणे रमेश भागवत (विश्वस्त, श्री देवदेवेश्वर संस्थान, पुणे) यांच्या उपस्थितीत उत्सव मंडपात आयोजित या उपक्रमात तब्बल २१८ गणेशभक्तांनी रक्तदान करून गणेशभक्तीला समाजसेवेची जोड दिली.
रमणबाग युवा मंच (ढोल पथक), रुद्र गर्जना ढोल पथक, संघर्ष ढोल पथक, परशुराम ढोल पथक, अभेद्य ढोल पथक या सर्व पथकांच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करून गणेशसेवेचा अर्थ अधिक व्यापक केला. तसेच श्री कसबा गणपती मंडळाचे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचा सक्रिय सहभाग लक्षणीय ठरला.
या उपक्रमाचा पाया २००९ मध्ये स्वाईन फ्लूच्या कठीण काळात घातला गेला. त्या वेळी रक्तदानासाठी पुढे येण्यास लोक टाळत होते, मात्र मंडळाने भीतीला न जुमानता हा उपक्रम सुरू केला. त्यानंतर दरवर्षी या शिबिरात सहभागी होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असून, ही सेवा परंपरा गणेशोत्सवातील एक महत्त्वाचा घटक ठरली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. मंडळाच्या वतीने सर्व रक्तदाते, सहकारी संस्थां, ढोल पथक कार्यकर्ते आणि समाजहितासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.