पुणे : निगडी ते चाकण या ४२ कि.मी. लांबीच्या मेट्रो मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवालावर (DPR) महा मेट्रो आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) यांच्यात चर्चा अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
या योजनेंतर्गत मेट्रो मार्गाची सुरुवात निगडी येथून होणार असून तो मुकाई चौक, वाकड, ताथवडे, नाशिक फाटा, मोढी आणि चाकण मार्गे जाणार आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील मेट्रो प्रवाशांसाठी प्रशासन या तिसऱ्या मेट्रो मार्गाला पुणे महानगर विकास प्राधिकरण (PMRDA) मार्फत उभारल्या जाणाऱ्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाशी जोडावे, जेणेकरून दोन्ही मेट्रो मार्गांमधील प्रवास सुलभ होईल आणि प्रवाशांना सहजपणे बदल करता येईल.
महा-मेट्रो (Maha-Metro) द्वारे राबविण्यात येत असलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाचा विस्तार आता पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व भागांना तसेच चाकण या औद्योगिक शहराशी जोडण्यासाठी करण्यात येणार आहे. या संदर्भात निगडी ते चाकण दरम्यान उभारण्यात येणाऱ्या एलिव्हेटेड मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे, निगडी भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाचा प्रकल्प अहवाल पिंपरी चिंचवड महापालिकेकडे सुपूर्द केला आहे. राज्य आणि त्यानंतर केंद्र शासनाकडून मान्यता मिळाल्यावर काम सुरू होईल. या प्रक्रियेसाठी किमान एक ते दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती डॉ. हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो यांनी दिली आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण हा प्रस्तावित सर्वात लांब मेट्रो मार्ग, पिंपरी-चिंचवड परिसरासह चाकण औद्योगिक क्षेत्रातील हजारो कामगार कर्मचाऱ्यांना या महा मेट्रोचा फायदा होणार आहे.
निगडी, वाकड, पिंपळे सौदागर, भोसरी मार्गे चाकणपर्यंत जाणारा "भक्ती शक्ती-वाकड-नाशिक फाटा-चाकण" हा प्रस्तावित मेट्रो मार्ग ४१ किलोमीटर लांब असून, एकूण ३१ स्थानकं असतील. हा पुणे मेट्रोचा आतापर्यंतचा सर्वात लांब मार्ग ठरणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण अंदाजे खर्च १०,३८३.८९ कोटी रुपये असेल.
या नव्या मार्गावरून प्रवाशांना इतर मेट्रो मार्गांवर बदल करता यावा यासाठी, वाकड येथे हिंजवडी-शिवाजीनगर मार्गाशी आणि संत तुकारामनगर स्थानकावर स्वारगेट-पिंपरी मार्गाशी स्कायवॉकद्वारे जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील कोणत्याही कोपऱ्यात सहज मेट्रोने जाता येईल.
हा मेट्रो मार्ग ८० किमी प्रतितास या कमाल वेगाने धावेल. २०३१ पर्यंत या मार्गावर दररोज सरासरी ३.३८ लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतील, असा अंदाज असून, २०६१ पर्यंत ही संख्या वाढून ७.८१ लाख होईल, असे सांगण्यात आले आहे.
ही योजना केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी प्रस्तावित करण्यात आली असून, एकदा मंजुरी मिळाल्यानंतर कामाला गती मिळेल.