याद्वारे ५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पौष्टिक आहार
पिंपरी चिंचवड : गेब्र. फिफर इंडिया प्रा. लि सीएसआरच्या माध्यमातून इस्कॉनच्या अन्नामृत फौंडेशनला दिलेल्या अन्न वितरण वाहनांचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.
गेब्र फिफरचे उपाध्यक्ष डॉ.एडवर्ड कुलेनकॅम्प,व्यवस्थाकीय संचालक ज्ञानेश वांजळे,
डॉ. थॉमस मासमॅन, मॅथीअस ड्युफर, जॉर्ज हेम्स, बर्न रोलॅन्ड हेनरीच,स्टेफनी हस्केन,पॅट्रिक सिमेन,
कास्टर्न केसर,प्रकल्प प्रमुख जय सस्ते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. बधालवाडी (नवलाखउंब्रे, ता. मावळ) येथे झलेल्या कार्यक्रमात अन्नामृत फाउंडेशनचे उपाध्यक्ष संजय टिक्कू, अन्नामृत फाउंडेशन पुण्याचे व्यवस्थापक संजय भोसले, निधी संकलन प्रमुख दीपक पाहवा, संजीत शर्मा यांनी वाहनांच्या चाव्या स्वीकारल्या.
यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते बधालवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत १७० विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराचे वितरण करण्यात आले. या शैक्षणिक वर्षांपासून कंपनीकडून एक हजार मुलांना शालेय भोजन आहार पुरवला जात आहे.
उपाध्यक्ष डॉ. कुलेनकॅम्प म्हणाले कि, अन्न वितरण वाहनांच्या माध्यमातून गेब्र. फिफर इंडिया शहरातील ५ हजार लाभार्थ्यांना गरम, ताजे आणि पौष्टिक अन्न अन्नामृतच्या माध्यमातून पोहोचवणार आहेत. या उपक्रमामुळे फाउंडेशनच्या भोजन योजनांवर अवलंबून असलेल्या मुलांना दररोज पौष्टिक आहार मिळणार असून त्यांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल.
कंपनीचे एमडी ज्ञानेश वांजळे म्हणाले, या उपक्रमाचा भाग होण्याचा आम्हाला आनंद आहे. आमची जबाबदारी केवळ व्यवसायापुरती मर्यादित नाही. अन्नामृत फाउंडेशनच्या सहकार्याने समाजाचे देणे आम्ही देत आहोत. पौष्टीक जेवणाच्या माध्यमातून मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
संजय टिक्कू म्हणाले, गेब्र. फिफर इं. कंपनीकडून मिळालेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे आम्हाला आणखी जास्त गरजू मुलांपर्यंत पोहोचता येईल.५ हजार मुले आणि कुटुंबासाठी प्रायोजित केलेले माध्यान्ह भोजन त्यांच्या आरोग्य व विकासावर दीर्घकालीन परिणाम करेल. असा विश्वास व्यक्त केला.