PCMC : मराठवाडासह राज्यातील महापूरग्रस्तांसाठी ‘‘एक हात मदतीचा’’



- भाजपा आमदार महेश लांडगे यांची यंत्रणा लागली कामाला

- सरचिटणीस विकास डोळस यांचे मदतकार्याचे आवाहन 

पिंपरी चिंचवड - काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाने झोडपले आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात अक्षरश: ओला दुष्काळ पडला आहे. अनेक संसार उद्धस्त झाले असून, शेतकरी हतबल झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये वाढदिवस किंवा सभा-समारंभांवर अनावश्यक खर्च न करता आपत्ती ग्रस्तांसाठी ‘एक हात मदतीचा’ देण्याचा संकल्प करण्यात आला आहे, अशी माहिती भाजपा सरचिटणीस विकास डोळस यांनी दिली. 

भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्त्वाखाली ‘एक हात मदतीचा’ उपक्रम सुरू केला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यात शेती आणि शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले. राज्यातील भाजपा महायुती सरकार सर्वोतोपरी मदतकार्य करीत आहे. पण, महापूरात संकटगस्त असलेल्या शेतकरी-कष्टकरी यांचा दसरा- दिवाळीवर ‘संक्रांत’ ओढावली आहे. शेवटच्या घटकाचीसुद्धा दिवाळी गोड झाली पाहिजे. यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला असून, शहरवासीयांना मदत उभा करण्याचे आवाहन केले आहे. 

सांगली-सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर आणि कोकणातील चक्रीवादळाच्या काळात आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडमधून मोठ्या प्रमाणात मदतकार्य केले होते. आता मराठवाडा आणि पूरग्रस्त भागात लोकसहभाग आणि वैयक्तीक अशी मदत करण्याचा संकल्प आमदार लांडगे आणि सहकाऱ्यांनी केला आहे. 

विकास डोळस म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमधील मराठवाडास्थित स्वयंसेवी संस्था, संघटना आणि दानशूर व्यक्तींनी मराठवाडासह अन्य भागातील आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी श्री. सुहास ताम्हाणे : 8087596196 यांच्याशी संपर्क करावा. तसेच, औद्योगिक व व्यापार क्षेत्रातील दानशूर व्यक्तींनी श्री. शुभम मानमोडे : 84467 52571 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन केले आहे. 


विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्य करणारे मराठवाड्यातील नागरिकांना आपल्या नातेवाईकांना मदत करायची असेल. त्यांनी श्री. अनिकेत गायकवाड : 89758 96999 आणि श्री. संदीप ठाणेकर : 97656 49797 यांना संपर्क करावा. आम्ही सर्वोतोपरी मदतकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

…. अशी करता येईल मदत! 

पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी मराठवाडा व इतर पुरग्रस्त भागात झालेल्या भीषण पूरस्थितीमुळे शेकडो कुटुंबाचे संसार उद्धस्त झाले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील पूरग्रस्थ पीडितांना आपण मदत करु शकता. तांदुळ, पीठ, तुरडाळ, तेल पॅकेट, मीठ-मिर्ची पावडर, हळद पावडर, पाणी जार, बिस्किट आणि ब्लँकेट व कपडे अशा स्वरुपात मदत करता येईल. एका कुटुंबाला किमान एक महिन्यांची भोजन व्यवस्था होईल, असे पॅकेट १ हजार रुपयांपर्यंत तयार करण्यात येईल. अशा स्वरुपात मदत करण्यासाठी श्री. संजय पटनी यांच्यासोबत 9822217163 संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भोसरी येथील महेशदादा स्पोर्ट्स फॉउंडेशन मैदान येथे प्रत्यक्ष मदत स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे.

प्रतिक्रिया: 

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये नैसर्गिक आपत्ती आली होती. त्यावेळी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक हात मदतीचा’ हा विधायक उपक्रम आम्ही हाती घेतला होता. आता राज्यात जे आस्मानी संकट उभे राहीले आहे. त्यामध्ये शेवटच्या घटकाला मदत व्हावी आणि किमान एका कुटुंबाची दिवाळी गोड करता यावी, अशा मदतकार्याचा संकल्प आम्ही केला आहे. शहरातील नागरिकांनी सामाजिक जाणिवेतून या उपक्रमात योगदान द्यावे, असे आवाहन करतो. 

- विकास डोळस, सरचिटणीस, भाजपा.

थोडे नवीन जरा जुने