PCMC पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड येथे 'नमो युवा रन' मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद


व्यसनमुक्ती, निरोगी व सुदृढ जीवनशैलीचा संदेश; मॅरेथॉनमध्ये तरुण-तरुणींसह विविध वयोगटांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला सहभाग

पिंपरी-चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने रविवारी सकाळी 'नमो युवा रन' मॅरेथॉनचे भव्य आयोजन करण्यात आले होते. 'एक दौड मोदीजी के नाम' या घोषणेने तरुणाईला एकत्र आणणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये तरुण-तरुणींसह विविध वयोगटांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत, देशभक्ती आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला.

पिंपळे सौदागर येथील लिनीयर गार्डन येथून या मॅरेथॉनला सकाळी ६ वाजता सुरुवात झाली. स्पर्धकांनी कोकणे चौकातून ८ टु ८० पार्कपर्यंतचा मार्ग उत्साहात पूर्ण केला. या उपक्रमात सहभाग घेण्यासाठी कोणताही प्रवेश शुल्क आकारण्यात आला नव्हता, ज्यामुळे सर्वांसाठी हा एक खुला सोहळा बनला होता.

मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉनला सुरुवात झाली. प्रसंगी झुंबा खेळाने सर्व सहभागींचा उत्साह वाढला. 

भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पिंपरी चिंचवड भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांची प्रमुख उपस्थिती लाभली, ज्यामुळे कार्यक्रमाला एक विशेष प्रतिष्ठा मिळाली.



यावेळी इंडियन रोवर नॅशनल चॅम्पियन मृण्मयी साळगावकर यांच्यासह आयरमॅन भूषण तारक, पराग जोशी, सचिन नेमाडे, सतीश शिंदे, प्रशांत यादव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, जिल्हा संघठन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशाली खाडये,  चंद्रकांत नखाते, महेश कुलकर्णी, प्रवक्ते कुणाल लांडगे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, नमो युवा रनचे संयोजक अमृत मारणे, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तुषार हिंगे, निवेदिता एकबोटे, युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलथे, टाटा मोटर्स कामगार संघटनेचे नेते सचिन लांडगे यांच्यासह नगरसेवक -नगरसेविका, प्रदेश पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी, विविध प्रकोष्ट पदाधिकारी, अनेक स्थानिक नेते आणि  कार्यकर्ते उपस्थित होते.

या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश केवळ पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त एक उपक्रम साजरा करणे हा नव्हता, तर त्यामागे काही महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश दडलेले होते. या उपक्रमातून युवकांमध्ये देशभक्तीची भावना रुजवणे, व्यसनमुक्तीचा संदेश देणे आणि निरोगी व सुदृढ जीवनशैलीचा प्रसार करणे हे मुख्य उद्दिष्ट होते. या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. तरुण-तरुणी, ज्येष्ठ नागरिक आणि अगदी लहान मुलांनीही या मॅरेथॉनमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमाने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना एकत्र आणले आणि एका विधायक हेतूसाठी धावण्यास प्रोत्साहित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी, भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवर आणि सहभागी नागरिकांचे आभार मानण्यात आले. अशाचप्रकारे तरुणांनी आणि नागरिकांनी सामाजिक आणि सकारात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

सूत्रसंचालन सागर बिरारी यांनी केले. आभार युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव यांनी मानले.

थोडे नवीन जरा जुने