घोडेगाव (आनंद कांबळे) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोडेगाव व जनता विद्या मंदिर, घोडेगाव येथील माजी विद्यार्थी तन्मय राजेंद्र घोडे याने मागील वर्षी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून, राज्य सरकारच्या निवासी शाळेत प्रवेश मिळवला आहे. त्याच्या या यशाने घोडेगाव, बोरघर आणि परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण पसरले आहे.
तन्मयने इयत्ता पाचवीमध्ये असताना शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये त्याने आपल्या मेहनतीच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर आपले वेगळेपण सिद्ध केले. या परीक्षेत त्याने मिळवलेल्या उत्कृष्ट गुणांच्या आधारे, त्याचा सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील शासकीय विद्यानिकेतन या निवासी शाळेत प्रवेश निश्चित झाला आहे.
ही शाळा राज्य सरकारद्वारे चालवली जाते आणि तिथे विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा मोफत उपलब्ध असतात, ज्यात निवास, भोजन, शिक्षण आणि इतर शैक्षणिक साहित्य यांचा समावेश आहे. त्यामुळे तन्मयच्या पुढील शिक्षणाचा मार्ग आता सुकर झाला आहे.
तन्मय हा अखिल भारतीय किसान सभेचे नेते राजू घोडे आणि जिल्हा परिषद शिक्षिका सुनीता घोडे यांचा मुलगा आहे. आई-वडील दोघेही सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे, तन्मयला घरातूनच अभ्यासाची आणि मेहनतीची प्रेरणा मिळाली. त्याचे वडील, राजू घोडे, शेतकरी हितासाठी अविरत संघर्ष करतात, तर आई, सुनीता घोडे, शिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहेत. अशा घरातून आलेला तन्मयही त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत आहे.
तन्मयच्या या यशाचे श्रेय त्याच्या आई-वडिलांच्या मार्गदर्शनासोबतच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोडेगाव व जनता विद्या मंदिर, घोडेगाव या शाळेतील शिक्षकांनाही जाते. यावेळी अखिल भारतीय किसान सभा, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) यांच्या वतीने तन्मय ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
भविष्यात तन्मय एक चांगला आणि जबाबदार नागरिक बनून देशाच्या प्रगतीत हातभार लावेल, अशी शुभेच्छा किसान सभेचे अशोक पेकारी यांनी व्यक्त केली आहे. अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अमोल वाघमारे, अशोक पेकारी, रामदास लोहकरे, दत्ता गिरंगे, कमल बांबळे, सुभाष भोकटे एसएफआय चे समीर गारे, दिपक वालकोळी, रोहिदास फलके, समीक्षा केदारी डीवायएफआयचे अविनाश गवारी यांनी ही तन्मय ला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Tanmay Ghode succeeds in scholarship exam-admission-confirmed-in-Government-Vidyanyakan-in-Satara