पिंपरी चिंचवड ( क्रांतीकुमार कडुलकर) - मराठवाड्यात मागील दोन महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उभी पिके भुईसपाट झाली असून हजारो दुभती जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. या पूरग्रस्त भागात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. या हवालदिल झालेल्या बांधवांना "मिशन मराठवाडा" अंतर्गत मदत देण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई या राज्यातील पत्रकारांच्या शिखर संस्थेने केले आहे.
त्या अंतर्गत पहिला टप्पा म्हणून भोसरी येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, नवमहाराष्ट्र मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई प्रदेश अध्यक्ष गोविंद वाकडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
लांडेवाडी, भोसरी तुळजा भवानी मंदिर (छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या मागे) रविवारी (दि.५) सकाळी ९ वाजता या रक्तदान शिबिराचे उद्घाटन होणार असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. संकलित झालेले रक्त गरजू रुग्णांना बार्शी येथील भगवंत ब्लड बँक आणि उमरगा, धाराशिव येथील श्री श्री रविशंकर ब्लड बँक स्टोरेज येथे सोमवार पासून उपलब्ध होईल. सहभागी होणाऱ्या सर्व रक्तदात्यांना आयोजकांच्या वतीने आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे. संकटात असलेल्या समाजबांधवांना मदतीचा हात देण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करणारी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ही पत्रकारांची पहिली संघटना आहे.
त्यांच्या बरोबर आमच्या संस्थेने सहभाग घेतला आहे. नातं रक्ताचं, विश्वासाचं आणि आधारचं जपण्यासाठी व ते वृद्धिंगत करण्यासाठी शहरातील सर्व पत्रकार बंधू, भगिनी, त्यांचे कुटुंबीय आणि मित्र मंडळींनी, तसेच इतर संस्था, संघटना, मंडळ, ट्रस्ट व सामाजिक कार्यकर्ते यांनी या महायज्ञात सहभागी व्हावे असे आवाहन भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे पाटील यांनी केले आहे.
गोविंद वाकडे - ९९२३८४६८२७, विश्वासराव आरोटे - ९४२३३८८५०८, नितीन शिंदे - ९०११६९९७९३, सचिन चपळगावकर - ९९२३११२७१२, पराग कुंकूळोळ - ९८२२३३६३५६
संजय (बापू) जगदाळे - ९०२८२६२८३३, विजय सुराणा - ९८२२४४८८२५, अतुल क्षीरसागर - ८२०८३००४८२ आदींनी संयोजनात सहभाग घेतला आहे.