जुन्नर (रफिक शेख) : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी स्व. डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणावरून वैद्यकीय समुदायात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
माहितीनुसार, डॉ. संपदा मुंडे यांचा मृतदेह फलटणमधील मधुदीप हॉटेलमध्ये २३ ऑक्टोबर रोजी आढळून आला. मृत्यूपूर्वी त्यांनी पोलीस कर्मचारी आणि काही राजकीय व्यक्तींनी वैद्यकीय अहवालात फेरफार करण्यासाठी टॉर्चर केल्याची तक्रार केली होती. या तक्रारीवरून त्यांना वारंवार दबाव आणण्यात आल्याचेही समोर आले आहे.
जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, व्यवस्थेने एका महिला डॉक्टरच्या मनात अविश्वासाची भावना निर्माण केली. ती एक सक्षम, बुद्धीमान आणि प्रामाणिक डॉक्टर होती. अशा व्यक्तींना जर या समाज व्यवस्थेत अन्याय सहन करावा लागत असेल, तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.”
संघटनेने पुढे नमूद केले आहे की, एक डॉक्टर घडवण्यासाठी शासनाचा आणि समाजाचा मोठा निधी आणि परिश्रम खर्ची पडतात. अशा कुशल डॉक्टरचा मृत्यू म्हणजे केवळ एका व्यक्तीची नव्हे, तर समाजाची हानी आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा देऊन न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास पुनर्स्थापित करणे आवश्यक आहे.
या निवेदनावर चेअरमन डॉ. प्रदिप जोशी, उपाध्यक्ष डॉ. राहुल तांबे, सचिव डॉ. संदीप काकडे आणि खजिनदार डॉ. नारायण राठोड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याबाबतची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच जिल्हाधिकारी सातारा व जिल्हाधिकारी पुणे यांना सुद्धा माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.
Junnar Taluka Medical Practitioners Association protests against Dr. Sampada Munde case
