PCMC : वाकड परिसरातील कावेरीनगर येथे उभारण्यात आलेल्या २५ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन..

 


महानगरपालिकेने वाकड येथे उभारलेल्या पाण्याच्या टाकीमुळे वाकड परिसरातील विविध भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार – आमदार शंकर जगताप

वाकड परिसरातील कावेरीनगर येथे उभारण्यात आलेल्या २५ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन....

पिंपरी चिंचवड  : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने वाकड परिसरातील कावेरीनगर येथे २५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची उंच टाकी उभारण्यात आली आहे. या टाकीतून आजपासून पाणीपुरवठा देखील सुरू करण्यात आला आहे. या पाण्याच्या टाकीमुळे वाकड परिसरातील कस्पटेवस्ती, पिंक सिटी रस्ता परिसर, वेणूनगर, कावेरीनगर, पोलीस कॉलनी, दत्त मंदिर रस्ता आदी परिसरातील गृहसंकुले अशा विविध भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.

कावेरीनगर,वाकड येथील वॉर्ड क्र. ५३, स. नं. २०८ मध्ये महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने ५ कोटी ८५ लाख रू.खर्च करून उभारण्यात आलेल्या २५ लाख लिटर्स क्षमतेच्या पाण्याची उंच टाकी व संपवेलचे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, स्थायी समितीच्या माजी सभापती ममता गायकवाड, माजी नगरसदस्य विनायक गायकवाड, संदीप कस्पटे, आरती चौंधे,  मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, अनिल भालसाखळे, क्षेत्रीय अधिकारी आश्विनी भोसले, कार्यकारी अभियंता महेश बरिदे, महेश कावळे, हेमंत देसाई, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उपअभियंता प्रविण धुमाळ, मनोज बोरसे, विश्वनाथ पाडवी,अमरजित म्हस्के,सामाजिक कार्यकर्ते सचिन साठे,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अनिल देशमुख,अध्यक्षा वृषालीताई मरळ, ग्लेग इंजिनिअर्सचे मोहनलाल शर्मा, यांच्यासह ज्येष्ठ नागरिक,विविध सामाजिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेने कावेरीनगर परिसरात उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे काम उच्च दर्जाचे केले आहे. शहरातील नागरिकांना चांगले रस्ते, मुबलक पाणी, आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका नेहमीच प्रयत्नशील असते. स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा देशात नावलौकिक आहे. आपल्या शहराचा झपाट्याने विकास होत असून शहराची लोकसंख्या देखील जवळपास ३५ लाखांपर्यंत गेली आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून येणाऱ्या काळात शहरातील सर्व नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून त्यांना राज्य सरकारकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे आमदार शंकर जगताप बोलताना म्हणाले.

------- 

आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून वाकड परिसरात २५ लाख लिटरची पाण्याची टाकी उभी राहिली आहे. यामुळे विविध भागातील पाणीपुरवठा सुरळित होईल. शहरातील प्रत्येक नागरिकासाठी मुबलक पाणीपुरवठा मिळणे ही महत्त्वाची बाब असते, त्यामुळे शहरामध्ये होणारा पाणीपुरवठा हा मुबलक व सुरळित होणे आवश्यक असते. यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभी करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सातत्याने विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत.-

-विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त

नवीन पंप हाऊसची उभारणी

कावेरीनगर येथे उभारण्यात आलेली नवीन टाकी नियमितपणे भरून परिसराला सुरळित पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाच्या वतीने येथे नवीन पंप हाऊस उभारण्यात आले आहे. ही टाकी भरण्यासाठी पंपिंग मशिनरी व विद्युत पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी ५० एचपी क्षमतेचे २ वर्किंग आणि १ स्टँडबाय पंप बसवण्यात आले आहेत,त्यामुळे ही संपूर्ण टाकी ६ तासातच भरणार आहे. या पंप हाऊससाठी २०० केव्हीए स्वतंत्र वीज भार मंजूर असून त्यासाठी स्वतंत्र २०० केव्हीए क्षमतेचे रोहित्र संच व उच्च दाब नियंत्रणासाठी २ आरएमयू देखील बसविण्यात आले आहेत.

अनिल भालसाखळे, सह शहर अभियंता (विद्युत)

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण धुमाळ यांनी तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी आभार मानले.

थोडे नवीन जरा जुने