PCMC : सांगवी–पिंपळे गुरव परिसरात मोकाट कुत्रे व जनावरांचा सुळसुळाट; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

 


पिंपरी चिंचवड - सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील विविध उपनगरांमध्ये व गल्लीबोळांत मोकाट कुत्रे आणि जनावरांचा उपद्रव वाढत असून नागरिक भयभीत झाले आहेत. रस्त्यावर चार–चार किंवा दहा–दहा जणांच्या टोळक्याने फिरणारी कुत्री आणि मोकाट जनावरे नागरिकांच्या अंगावर धावून येत असल्याने भीतीचे सावट निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की, शहरातून गाय–म्हैस–बैल यांचे अस्तित्व जवळपास नाहीसे होत आहे. मनपाने चिखली येथील सर्वे क्रमांक १६५५ मधील पाच एकर जागेवर गुरांचा गोठा उभारण्याचा प्रस्ताव विकास आराखड्यात केला असला तरीही तो अद्याप कागदावरच असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.



नुकताच मा. न्यायालयाने शाळा, रुग्णालये, क्रीडा संकुले, उद्याने, बस स्थानके आणि रेल्वे स्थानक परिसरात भटकी जनावरे व कुत्र्यांना निवारागृहात हलविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या आदेशांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप जोगदंड यांनी केला. “नियोजनशून्य कारभाराला महानगरपालिकेचा पशुवैद्यकीय विभाग जबाबदार आहे. नागरिकांना फक्त टोलवाटोलवीची उत्तरे मिळतात,” असे त्यांनी सांगितले.

या उपद्रवावर वेळीच नियंत्रण आणण्यात यावे, तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना कुत्र्यांच्या दहशतीतून मुक्त करावे, अशी मागणी जोगदंड यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांना निवेदन देऊन केली.

निवेदनावर शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, सचिव गजानन धाराशिवकर, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड तसेच शहराध्यक्षा मीनाताई करंजवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


थोडे नवीन जरा जुने