पिंपळे गुरवच्या सृष्टी चौकात वाहतूक नियंत्रक सिग्नल बसविण्याची मागणी

Demand to install traffic control signals at Srushti Chowk in Pimple Gurav


प्रभाग २९ मधील अरुण पवार यांचे वाहतूक शाखेला निवेदन 

पिंपळे गुरव : पिंपळे गुरव येथील महत्त्वाचा चौक असलेल्या सृष्टी चौकात नित्याची वाहतूक कोंडी व अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, या चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी पिंपळे गुरव प्रभाग २९ मधील मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या संदर्भात अरुण पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपळे गुरव येथील तुळजाभवानी मंदिर ते वाकड-भोसरी बीआरटीएस रस्त्या दरम्यान असलेल्या सृष्टी चौकात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना अवघ्या पाचशे मीटर अंतरासाठी तब्बल एक ते दीड तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे बनले आहे. 

पिंपळे गुरवमधील हा महत्त्वाचा रस्ता आहे. औंध, सांगवीतून पिंपरी, पिंपळे सौदागरकडे जाण्या-येण्यासाठी स्कुल बसेस, कंपनीच्या बसेस, रिक्षा, पीएमपीएमएल बसेस, दुचाकीस्वार या रस्त्याचा सर्रास वापर करतात. रस्ता प्रशस्त झाल्याने वाहने नेहमीच सुसाट असतात. मात्र, पिंपळे गुरवमधील सृष्टी चौकात कासारवाडीकडून येणारी वाहने, जगताप पेट्रोल पंपाकडून येणारी वाहने, सांगवी, औंधकडून येणारी वाहने आणि वाकड-भोसरी बीआरटीएस रस्त्यावरून पिंपळे गुरवकडे येणारी वाहने सृष्टी चौकात येतात. परंतु सृष्टी चौकात सिग्नल यंत्रणा नसल्याने मोठी वाहतूक कोंडी होते.    

वाहनचालकांमध्ये गोंधळ निर्माण होतो. यामुळे किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात वारंवार घडतात. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सिग्नल यंत्रणा आणि वाहतूक पोलिसांची नेमणूक अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे महापालिका आणि वाहतूक पोलिस विभागाने या मागणीवर त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा अरुण पवार यांनी व्यक्त केली.

दरम्यान, अरुण पवार यांनी केलेली मागणी रास्तच आहे, असे म्हणत स्थानिक नागरिक, व्यावसायिक, रहिवासी यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

थोडे नवीन जरा जुने