पिंपरी चिंचवड : मोशी येथील सदानंद एज्युकेशन संस्थेच्या Excellent International School & Junior College यांचे शैक्षणिक वर्ष 2025–26 चे वार्षिक स्नेहसंमेलन भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडले.
या कार्यक्रमास सदानंद एज्युकेशन संस्थेच्या चेअरवुमन सौ. दीपाली शिंदे, सचिव श्री. दत्तात्रय शिंदे व Vice Chairman अभिषेक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. किशोर थोरात, विद्यार्थी करिअर मार्गदर्शन तज्ज्ञ हिरेमठ सर, पालक प्रतिनिधी सुरेश बनकर, पानिग्रही सर, शेरकर सर, मोशी नगरीतील विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य अमोल नेहेरे सर, संस्थेचे समन्वयक किरण शिंदे, Excellent जाधववाडीच्या प्राचार्या सौ. सविता थोरात, Excellent सद्गुरूनगरच्या प्राचार्या सौ. वंदना भैरू, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
स्नेहसंमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनीच केले, ज्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासाचे व नेतृत्वगुणांचे दर्शन घडले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्याविष्कारांनी, देशभक्तीपर गीतांवर आधारित नृत्यांनी आणि नारी शक्तीचे सामर्थ्य दर्शविणाऱ्या सादरीकरणांनी सभागृह देशप्रेम व सन्मानाच्या भावनेने भारावून गेले.
यावेळी बोलताना प्राचार्य अमोल नेहेरे सर यांनी “शेतकरी का देशाचा कणा आहे” यावर अत्यंत भावनिक आणि विचारप्रवर्तक मनोगत व्यक्त केले. तसेच त्यांनी वडिलांचे जीवनातील अनमोल स्थान अतिशय हृदयस्पर्शी शब्दांत मांडत उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणले. तर संस्थेचे समन्वयक किरण शिंदे यांनी वडिलांवरील भावनिक गीत सादर करून संपूर्ण सभागृह भावनाविवश केले आणि कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त करून दिली.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संस्थेचे सचिव श्री. दत्तात्रय शिंदे यांनी, “पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्वात मोठे व दर्जेदार शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचा आमचा मानस आहे,” असे सांगितले.
किशोर थोरात यांनी आपल्या भाषणात “आजच्या काळात विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित शिक्षण देणे काळाची गरज असून शाळांनी कौशल्य विकासावर अधिक भर द्यावा,” असे मत व्यक्त केले.
शिस्तबद्ध आयोजन, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, सांस्कृतिक वैविध्य व सामाजिक मूल्यांची जाणीव करून देणारे सादरीकरण यामुळे हे स्नेहसंमेलन उपस्थितांच्या स्मरणात दीर्घकाळ राहणारे ठरले.

