धानोरे शाळेत वृक्षारोपण उत्साहात
आळंदी (अर्जुन मेदनकर) : पुणे जिल्हा परिषद व सह्याद्री देवराई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुक्यातील धानोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण व मार्गदर्शक कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला सह्याद्री देवराई फाऊंडेशनचे संस्थापक तथा सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
आजचे विद्यार्थी हेच उद्याच्या सक्षम महाराष्ट्राचे, सक्षम भारताचे आदर्श नागरिक होणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाबाबत आदराची भावना व पर्यावरण संवर्धनाचा संस्कार पेरणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादाने हा हेतू साध्य झाला याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी आनंद व्यक्त केला.
या अभिनव उपक्रमास सयाजी शिंदे, आयुष मंत्रालयाचे तांत्रिक सल्लागार साहेबराव मेंगडे, गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

