पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा राजकीय डाव टाकत भाजप शहराध्यक्षाला थेट आव्हान दिले आहे. पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ मधून भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवा व तगडा उमेदवार उमेश काटे यांना उतरवण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
ही रणनीती अखेरच्या क्षणी ठरवण्यात आल्याने भाजपसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचार प्रमुख नाना काटे यांनी अखेरच्या क्षणी मोठा राजकीय डाव टाकल्याने प्रभागात व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप शहराध्यक्षांच्याच प्रभागात त्यांना अडकवण्याची ही मोठी खेळी राष्ट्रवादी काँग्रेसने आखल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही लढत केवळ स्थानिक प्रभागापुरती मर्यादित न राहता, थेट प्रतिष्ठेची आणि राजकीय शक्तीपरीक्षेची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात नाना काटे यांनी सुरुवातीपासूनच अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने उमेदवारांची मांडणी केल्याचे चित्र पहायला मिळाले. प्रत्येक प्रभागात ताकदवान, स्थानिक पातळीवर प्रभाव असलेले उमेदवार उभे करून भाजपला कडवी झुंज देण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यातच आता थेट भाजप शहराध्यक्षांच्या विरोधातच तगडा उमेदवार दिल्याने शत्रुघ्न काटे यांना मोठा धक्का बसणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
