जुन्या आठवणींनी वर्गमित्र भावूक, आनंदाश्रूंनी डोळे भरले
अंबड (जालना) : गोंदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने तब्बल 42 वर्षांनंतर स्नेहमिलन व गुरुजनांचा आत्मीय सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या भावनिक सोहळ्याला विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले तब्बल 225 माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
या कार्यक्रमास तत्कालीन शिक्षक सुरेश गोंदीकर, श्रीकांत गोंदीकर, बाबुराव होन्ना, शरद तांबोळी, विजय पारसेवार, बाबासाहेब वाघमारे, सुरेश कुटे यांच्यासह सरपंच सुनीता गव्हाणे, उपसरपंच मन्सूर शेख, विद्यमान मुख्याध्यापक सर्जेराव गडदे, माजी उपसरपंच शेखर सोळुंके, सोमनाथ गव्हाणे, कचरू मरकड आदी मान्यवर उपस्थित होते.
या निमित्ताने शाळेसाठी विविध भेटवस्तू देण्यात आल्या. सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ऑल-इन-वन प्रिंटर देण्यात आला. सौ. कविता कदम यांच्या वतीने 32 इंच टीव्ही व DVR,
सौ. देवकन्या तोतला व प्रमोद तोतला यांच्या वतीने साउंड सिस्टीम, सौ. मंगल पहाडे यांच्या वतीने पंखे, तर बाबू चांडगे यांच्या वतीने भिंतीवरील घड्याळे देण्यात आली.
प्रभाकर मिरकड यांनी दरवर्षी दहावीच्या पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षिसासाठी 25 हजार रुपयांचा निधी जाहीर केला, तर अशोक जैस्वाल यांनी 10 हजार रुपयांची देणगी जाहीर केली.
सौ. नीता कोठारी व राजेश कोठारी यांनी वृक्षारोपणासाठी झाडे व फुलझाडे देण्याचे मान्य केले. विशेष म्हणजे मुलींकडून सहभाग शुल्क घेतले नसतानाही सुमारे 20 विद्यार्थिनींनी 20 हजार रुपयांची देणगी शाळेसाठी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रमोद तोतला यांनी स्नेहमिलनाची संकल्पना मांडत, “आपण ज्या शाळेत शिकलो, खेळलो, बागडलो, त्याच शाळेत हा कार्यक्रम व्हावा, हा माझा आग्रह होता,” असे सांगून सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. सूत्रसंचालन विजय जाधव व बळीराम काळे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, स्वागतगीत व दिवंगत शिक्षक व माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. उपस्थित माजी शिक्षकांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
42 वर्षांपूर्वीच्या शालेय जीवनातील निरागसपणा, मधल्या सुटीतील डब्यांची ओढाताण, शिक्षकांची धास्ती आणि पावसाळ्यातील धमाल अशा अनेक आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.
“कोण काय करते?” यापेक्षा “तू कसा आहेस?” या प्रश्नाने सर्वांचे मन भरून आले. फौजी, डॉक्टर, अभियंते, पोलीस, शिक्षक, प्राध्यापक, अधिकारी व व्यावसायिक अशा विविध क्षेत्रांत स्थिरावलेले मित्र पुन्हा एकदा शाळेच्या अंगणात एकत्र आले.
या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपला कौटुंबिक परिचय दिला, तर गुरुजनांनी आपल्या आठवणी सांगितल्या. गुरुजी बाबासाहेब वाघमारे यांनी सहलीतील मजेशीर प्रसंग सांगत सर्वांना हसवले.
श्री. सुरेश जहागीरदार सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे उदाहरण देत, प्रमोद तोतला यांनी सर्व मित्रांना एकत्र आणल्याबद्दल विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मनोज मरकड यांच्या वतीने आयोजित स्नेहभोजनाचा सर्वांनी आनंद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद तोतला, मनोज मरकड, श्रीमंत सोळुंके, कृष्णा गवळी, अशोक काळे, शिवाजी गवळी, दिलीप जगरवाल, परमेश्वर गुळवणे, मनोहर पवळे, कमलाकर रामदासी, संजय सोळुंके, निलेश काला, कल्याण तोडेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
शेवटी गाण्यांच्या तालावर नाचत, गात आणि आठवणींना उजाळा देत सर्वांनी जड अंतःकरणाने निरोप घेतला.

