विकास कामाचा माणूस हरपला...

 


अजितदादा पवार यांना काशिनाथ नखाते यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी, निर्णयक्षम आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेतृत्व गमावले आहे, अशी भावना व्यक्त करत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.

नखाते म्हणाले की, अजितदादा पवार यांना अनेक वेळा विविध कामे तसेच असंघटित कामगारांच्या ज्वलंत समस्यांवर भेटण्याचा योग आला. प्रत्येक वेळी दिलेले निवेदन ते अत्यंत लक्षपूर्वक वाचायचे. विषय कोणताही असो, त्यावर त्वरित मत स्पष्ट करणे आणि संबंधित मुद्द्यांचा सखोल अभ्यास करून निर्णय घेणे ही त्यांची खास कार्यशैली प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळाली. निवेदन दिल्यानंतर ते लगेचच सोबत असलेल्या स्वीय सहाय्यकांना संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठवण्याचे आदेश द्यायचे. कामगार सुरक्षेबाबत ते जातीने लक्ष द्यायचे.

घरेलू कामगारांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी घरेलू कामगार कल्याणकारी महामंडळासाठी तब्बल २५० कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली. तसेच फेरीवाला कायद्याबाबत निवेदन दिल्यानंतर त्यांनी तातडीने पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांशी फोनवर संवाद साधून निर्णय प्रक्रियेला गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. कामगार, कष्टकरी आणि असंघटित घटकांच्या हक्कांसाठी ते नेहमीच ठाम भूमिका घेत असत, असेही नखाते यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले, “अजितदादा यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक अनुभवी, निर्णयक्षम आणि जनतेशी थेट जोडलेले नेतृत्व गमावले आहे. हे नुकसान भरून न निघणारे असून महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवेल.” कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र आणि 

महाराष्ट्रातील तमाम कामगाराकडून त्यांना भावपूर्ण आदरांजली.

थोडे नवीन जरा जुने