आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी रक्षा विसर्जन स्थळ स्मारक येथे अभिवादन करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण करीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवन कार्याचे स्मरण केले.
महात्मा गांधी यांचे विचार जोपासण्याची संवर्धन करून आचरणात आणण्याची आधुनिक स्पर्धेच्या युगात गरज असल्याचे मान्यवरांनी सांगितले. विचारांना आदरांजली वाहिली. या प्रसंगी कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.मनोज राका, आळंदी शहराध्यक्ष संदीप नाईकरे पाटील, माजी शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर, मयुर कुऱ्हाडे, अर्जुन मेदनकर, महादेव पाखरे, गौरव सदानंद, राजेश नागरे, साहेब बांगर यांच्या सह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी माजी शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार प्रेरणादायी आहेत. स्पर्धेच्या युगात सामाजिक व राजकीय परिस्थितीत सत्य, अहिंसा, समता आणि बंधुभाव या गांधीजींच्या मूल्यांची समाजाला अधिक गरज आहे. गांधी विचार हे केवळ इतिहासा पुरते मर्यादित नसून, ते आज ही समाजाला दिशा देत आहेत. महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत समाजात सलोखा, शांतता व सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी प्रत्येकाने गांधी विचार आत्मसात करण्याचे आवाहन नंदकुमार वडगावकर यांनी केले.
