ब्रेकिंग न्यूज | कृष्णा नगर, स्पाईन रोड – चिंचवड ट्राफिक सिग्नल नादुरुस्त, चौकात वाहतूक ठप्प!

 


 प्रशासनाच्या गलथान कारभाराला जबाबदार कोण?

पिंपरी चिंचवड : कृष्णा नगर, स्पाईन रोड, चिंचवड येथील अत्यंत वर्दळीच्या चौकातील दिशादर्शक ट्राफिक सिग्नल अचानक बंद पडल्याने चौकातील चारही रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सिग्नल बंद असतानाही त्या ठिकाणी एकही ट्रॅफिक पोलीस नियुक्त नसल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली.

परिणामी, चारही दिशांना सुमारे दोन-दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कामगार, विद्यार्थी, रुग्णवाहिका, महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला.

या गोंधळामुळे वाहनचालक व परिसरातील नागरिकांना मानसिक त्रासासोबतच आर्थिक व सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

 “सिग्नल बंद पडल्याची माहिती असूनही वेळेवर दखल का घेतली गेली नाही?”

 “वाहतूक नियंत्रणासाठी तातडीची व्यवस्था का करण्यात आली नाही?”

असे सवाल उपस्थित करत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

 सजग नागरिकांची तत्परता, मोठा अनर्थ टळला

दरम्यान, स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते श्री. शिवानंद चौगुले यांच्या लक्षात हा तांत्रिक बिघाड येताच त्यांनी चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल साळुंखे यांना तात्काळ फोनद्वारे माहिती दिली.

या माहितीची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक श्री. साळुंखे यांनी त्वरित पर्यायी व्यवस्था उभी करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी पावले उचलली, त्यामुळे परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आली.





संपूर्ण चौकशीची मागणी

स्थानिक नागरिक व वाहनचालकांची ठाम मागणी आहे की,

 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी,

 संपूर्ण घटनेचा खातेनिहाय आढावा घ्यावा,

आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी,

जेणेकरून भविष्यात अशा निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये.

 नागरिकांचा त्रास, प्रशासनाची उदासीनता आणि सजग नागरिकांची जबाबदारी—या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे :

सिस्टम झोपलेली असताना नागरिकच का जागे राहतात?”

थोडे नवीन जरा जुने