!-- afp header code starts here --> नागरिकांच्या वीज समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

नागरिकांच्या वीज समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

 


पिंपरी-चिंचवड (शिवानंद चौगुले) : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील शाहूनगर, संभाजीनगर, काळभोरनगर, निगडी प्राधिकरण, मोहननगर, मोरवाडी, विद्यानगर आणि आकुर्डी परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची गंभीर दखल घेत सावरकर भवन, निगडी प्राधिकरण येथे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत नागरिकांच्या विविध तक्रारींवर सखोल चर्चा करण्यात आली असून वीज समस्यांवर तातडीने आणि प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश महावितरण प्रशासनाला देण्यात आले.

बैठकीदरम्यान नागरिकांनी वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे, तक्रारींचे विलंबाने निवारण, वाढती वीज मागणी आणि अपुरी मनुष्यबळ व्यवस्था यासह विविध समस्या मांडल्या. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व तक्रारी गांभीर्याने ऐकून घेत लवकरात लवकर त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. प्रत्येक बुधवारी तक्रार निवारण दिनाच्या माध्यमातून वीज समस्यांचा विशेष आढावा घेण्यात येणार असून २८ ऑगस्टपर्यंत प्रलंबित तक्रारींचे प्राधान्याने निवारण केले जाणार आहे. वाढत्या वीज मागणीचा विचार करून आवश्यक त्या विभागांमध्ये अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. भविष्यातील वीजपुरवठा अधिक सक्षम व सुरळीत राहावा यासाठी नवीन वीज उपकेंद्र (सब-स्टेशन) उभारणीच्या प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे. तसेच नागरिकांकडून दूरध्वनीद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्यासाठी विशेष तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

या बैठकीस उपमहापौर सौ. शर्मिलाताई बाबर, नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे, नगरसेविका सौ. सुप्रियाताई चांदगुडे, नगरसेवक श्री. अमित गावडे, कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती श्री. कैलास कुटे, माजी नगरसेवक श्री. राजू दुर्गे, भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष श्री. अनुप मोरे, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी तसेच परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये वीजपुरवठ्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्याचे सांगत, वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक आणि लघुउद्योजक यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद केले. त्यामुळे तक्रारींचे केवळ नोंदवहीपुरते मर्यादित न ठेवता त्यांचे निश्चित कालमर्यादेत निराकरण करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

महावितरण प्रशासनानेही नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासोबतच भविष्यात अशा समस्या कमी करण्यासाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा आणि पायाभूत सुविधा उभारणीवर भर दिला जाईल, असे स्पष्ट केले.

नागरिकांच्या प्रत्येक समस्येचे वेळेत, पारदर्शक आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी समन्वयाने काम करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

थोडे नवीन जरा जुने