नारायण मेघाजी लोखंडे हे कामगारांचे पहिले वाली - पुरुषोत्तम सदाफुले

 


पिंपरी चिंचवड - कामगार सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काम करत होते, कामगारांना कुठलाही अधिकार प्राप्त होत नव्हता अशा १८९७ च्या कालावधीमध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांना एकत्रित केले आणि १० हजार मिल मजदूरांची सभा घेऊन त्यांना हक्क मिळवून देण्याचे काम केले. कामगारांचा भारतातील पहिला वाली म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे होते, असे मत महाराष्ट्र कामगार कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी आज व्यक्त केले. 

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, रिक्षा -टॅक्सी महासंघ यांच्यावतीने आज रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त थरमॅक्स चौक चिंचवड येथील महासंघाचे प्रांगणात कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अध्यक्षस्थानी कामगार नेते काशिनाथ नखाते होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लेखक अरुण गराडे, कवी प्रभाकर वाघोले, उपाध्यक्ष राजेश माने, राजू बिराजदार, लाला राठोड, शमशुद्दीन शेख, वंदना पाटील, सुमन कोरे, अंजली जाधव, नंदा जाधव आदी सह कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.

मेळाव्याची सुरुवात लोखंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कवी प्रभाकर वाघोले यांनी सुरुवातीलाच "चेहरा घामाचा नवा चेहरा, घामाने रुजविला कामाचा चेहरा, घे वळण नव्याने घामा" या कवितेने सुरुवात केली. गराडे म्हणाले की, कामगारांना खूप राबवून घेतले जायचे, शारीरिक हानी सुद्धा होत होती, सुट्ट्या सुद्धा मिळत नव्हत्या अशा बिकट  प्रसंगी लोखंडे भक्कम उभे राहिले, नंतरच्या कार्यकाळात दादा रुपमय चटर्जी यांनीही कामगारांच्या कल्याणासाठी अनेक काम केले आणि पिंपरी चिंचवड मधल्या कामगारांना न्याय दिला.

पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले की, पूर्वीचे कारखाने व कामगार आणि आताची परिस्थिती यामध्ये अमुलाग्र बदल घडलेला असून कामगारांसाठी काम करणाऱ्या संघटनांची उणीव सध्याच्या कालावधीमध्ये भासत आहे. सध्या कारखाने बंद पडत आहेत. किरकोळ कारणावरून कामगारांना काढून टाकले जात आहे आणि कामगारांना वाली राहिलेले नाही, अशा स्थितीमध्ये नारायण मेघाजी लोखंडे, पद्मश्री नारायण सुर्वे यांची आठवण होते. 

आजच्या स्थितीत खऱ्या अर्थाने कामगारांचं हित संवर्धन करणाऱ्या संघटनांची गरज आहे संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे आणि ती कष्टकरी महासंघाच्या माध्यमातून न्यायासाठी प्रयत्नशील आहे. पूर्वीचा काळ असो किंवा आताचा संघर्षाशिवाय पर्याय नाही याचा बोध कामगारांनी नक्कीच घ्यावा. कामगारांच्या हक्काच्या विविध घोषणा देऊन कामगारांनी मेळाव्यात चैतन्य निर्माण केले. सुनीता पोतदार यांनी आभार मानले.

थोडे नवीन जरा जुने