पिंपरी चिंचवड (शिवानंद चौगुले) - शहरातील प्राधिकरण परिसरात वसलेले श्री मल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्ट संचलित श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. “ॐ नमः शिवाय”च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला असून मंदिराबाहेर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
या भागातील अत्यंत पुरातन आणि श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या या मंदिराची उभारणी सन १९९१ मध्ये करण्यात आली. त्यानंतर १९९९ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करून अधिक भव्य आणि सुसज्ज स्वरूप देण्यात आले. दरवर्षी श्रावण मास तसेच महाशिवरात्रीला येथे हजारो भाविक मनोभावे पूजा, अभिषेक व दर्शनासाठी उपस्थित राहतात.
वीरशैव लिंगायत समाजाच्या पुढाकारातून उभारण्यात आलेले हे मंदिर आज सर्व शिवभक्तांसाठी खुले असून, आध्यात्मिक आणि धार्मिक केंद्र म्हणून लौकिकास आले आहे.
यंदाही महाशिवरात्री निमित्त विशेष पूजा-अर्चा, रुद्राभिषेक आणि दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांना सुलभ आणि शांततेत दर्शन घेता यावे यासाठी ट्रस्टच्या वतीने उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे. स्पर्शदर्शनाची विशेष व्यवस्था, रांगेचे शिस्तबद्ध नियोजन, पिण्याच्या पाण्याची सोय व स्वयंसेवकांची तत्पर सेवा यामुळे भाविक समाधान व्यक्त करत आहेत.
मंदिराचे कार्यकारिणी सदस्य व कार्यकर्ते दिवसरात्र भाविकांच्या सेवेत कार्यरत असून, सर्वांच्या सहकार्यामुळे उत्सव सुरळीत पार पडत असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष एस. बी. पाटील यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड शहरातील हे श्रद्धास्थान आज भक्ती, सेवा आणि अध्यात्म यांचा संगम अनुभवत असून, महाशिवरात्रीच्या दिवशी खऱ्या अर्थाने भक्तीचा महासागर येथे लोटला आहे.
