निवडणूक संपून दिवस उलटले, पण प्रशासनाला मोकळीक देण्यास वेळ नाही?
पिंपरी-चिंचवड (शिवानंद चौगुले) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या फ प्रभाग अंतर्गत येणाऱ्या यमुनानगर येथील श्रीराम चौकातील सुशोभीकरणासाठी उभारण्यात आलेला भव्य हत्तीचा शिल्प आजही झाकलेल्या अवस्थेतच असून, यामुळे महापालिका प्रशासनाचा ढिसाळ व अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, हत्ती हे एका राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह असल्यामुळे संबंधित शिल्प पूर्णतः झाकण्यात आले होते. मात्र निवडणुका होऊन निकाल जाहीर होऊनही कित्येक दिवस उलटले असताना आजतागायत हा हत्ती उघडण्यात आलेला नाही. यामुळे “निवडणूक आयोग आपली जबाबदारी तत्परतेने पार पाडतो, पण महापालिका प्रशासन मात्र उदासीन का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
महापालिकेने लाखो रुपये खर्च करून चौकांच्या सुशोभीकरणासाठी उभारलेले हे हत्तीचे शिल्प शहराच्या सौंदर्यात भर घालणारे असताना, प्रत्येक निवडणुकीनंतर त्याकडे केले जाणारे दुर्लक्ष ही आता ठरलेली बाब बनली आहे. निवडणुकीपुरते नियम काटेकोरपणे पाळले जातात, पण त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी अचानक संपते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या झाकलेल्या अवस्थेमुळे चौकाचे संपूर्ण सुशोभीकरण विद्रूप झाले असून, शहराच्या सौंदर्याऐवजी शहर विद्रूपीकरणालाच हातभार लागतो आहे की काय, अशी भावना स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र होत आहे. हे दृश्य पाहता ‘सौंदर्यीकरण’ हा केवळ कागदी दिखावा तर नाही ना, अशी शंका उपस्थित होते.
या प्रकरणी संबंधित प्रभाग अधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून आपले कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे. तसेच नुकतेच निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी केवळ आश्वासनांपुरते न थांबता, अशा मूलभूत आणि शहराच्या प्रतिमेशी निगडित विषयांवर ठोस कृती करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शहराचे सौंदर्य धोक्यात येत असेल, तर जबाबदारी निश्चित कोणाची?
आणि या दुर्लक्षासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार?
असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
