गेल्या १२ दिवसांत चार वेळा इंधन दरवाढ; मग सर्वसामान्यांच्या पगारात वाढ कधी?

 


पिंपरी चिंचवड (किशोर थोरात) : देशात दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई आणि इंधन दरवाढ यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. गेल्या अवघ्या १२ दिवसांत तब्बल चार वेळा इंधन दरवाढ झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही मोठी वाढ होत आहे.

एका बाजूला इंधन, गॅस, भाजीपाला, किराणा आणि औषधांच्या किमती सातत्याने वाढत आहेत, तर दुसऱ्या बाजूला सामान्य कामगार, शेतकरी, कर्मचारी आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या उत्पन्नात कोणतीही वाढ होताना दिसत नाही. “इंधन दर रोज वाढतात, मग सामान्य माणसाच्या पगारात वाढ कधी होणार?” असा सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे.

महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडले असून अनेकांना रोजच्या गरजा भागवणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण, घरभाडे, वीजबिल, आरोग्य खर्च आणि प्रवास खर्च यामध्ये मोठी वाढ झाल्याने नागरिक मानसिक व आर्थिक तणावाखाली जीवन जगत आहेत.

सरकारने वाढती महागाई रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, इंधनावरील कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा तसेच सर्वसामान्यांच्या उत्पन्नवाढीसाठी धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

आज गरज आहे ती केवळ घोषणांची नाही, तर सामान्य माणसाला दिलासा देणाऱ्या प्रभावी निर्णयांची. अन्यथा वाढती महागाई आणि असंतोष भविष्यात गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण करू शकतो.

थोडे नवीन जरा जुने