अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर एमआरपी विरोधात सविनय सत्याग्रह आंदोलन

 


पुणे (वर्षा चव्हाण) : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर एमआरपी व्यवस्थेतील अपारदर्शकता, खोट्या डिस्काउंटच्या नावाखाली होणारी ग्राहकांची आर्थिक लूट आणि बाजारातील अन्यायकारक व्यापार पद्धतीविरोधात सविनय सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाद्वारे ग्राहकांच्या आर्थिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी ग्राहकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

ग्राहक पंचायतने सरकारसमोर पुढील प्रमुख मागण्या मांडल्या :

1. प्रत्येक वस्तूवर उत्पादन खर्च जाहीर करण्यात यावा

2. वस्तूची प्रथम विक्री किंमत नमूद करण्यात यावी

3. खोट्या Discount व Offer जाहिरातींवर बंदी घालण्यात यावी

4. मनमानी एमआरपीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्यात यावी


या आंदोलनात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा संपर्क अधिकारी सूर्यकांत पाठक, बाळासाहेब औटी, विजय सागर, ज्ञानेश्वर उंडे, विलास लेले, श्रीकांत जोशी, अशोक भोर, जगन्नाथ खोकराळे, देविदास काळे, देवराम तट्टू, तुकाराम फराटे, देवराम नाबगे, संजय चिंचपुरे, कौशल्याताई फापाळे, मनीषा भोर, अनिता गाढवे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्राहक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

“उत्पादन खर्च जाहीर करा — ग्राहकांची आर्थिक लूट बंद करा!” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. ग्राहक हक्कांच्या संरक्षणासाठी हा संघर्ष अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

थोडे नवीन जरा जुने