!-- afp header code starts here --> पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची तुफान बॅटिंग; पहिल्या जोरदार सरींचे नागरिकांकडून उत्साहात स्वागत

पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची तुफान बॅटिंग; पहिल्या जोरदार सरींचे नागरिकांकडून उत्साहात स्वागत

 


वार्ताहर : शिवानंद चौगुले

महाराष्ट्र जनभूमी न्यूज पोर्टल

पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने अक्षरशः तुफान बॅटिंग करत संपूर्ण शहराला झोडपून काढले. गेले अनेक दिवस वाढलेल्या उकाड्यामुळे आणि असह्य वातावरणामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पहिल्या जोरदार पावसाने मोठा दिलासा मिळाला. मात्र अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊ लागला. काळ्याकुट्ट ढगांनी संपूर्ण शहर व्यापले आणि काही क्षणांतच वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक चौकांमध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली तर काही ठिकाणी सिग्नल यंत्रणाही विस्कळीत झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, भोसरी, सांगवी, वाकड, थेरगाव आणि प्राधिकरण परिसरातील अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याचे दिसून आले. काही ठिकाणी रस्ते अक्षरशः लहान तळ्यांचे स्वरूप धारण करताना दिसले. पावसामुळे दुचाकीस्वार, पादचारी आणि कार्यालयातून घरी परतणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या. तसेच अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यालगत व्यवसाय करणारे छोटे व्यापारी, फेरीवाले आणि हातगाडी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले. अनेकांनी आपला माल वाचवण्यासाठी धावपळ केली. काही ठिकाणी दुकानांमध्येही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला.

दरम्यान, प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी मात्र या पहिल्या जोरदार पावसाचे उत्साहात स्वागत केल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी युवकांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला तर लहान मुलांनीही पावसात खेळण्याचा आनंद घेतला. सोशल मीडियावरही “पहिला पाऊस” आणि “पिंपरी-चिंचवड रेन मोमेंट्स” अशा पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसल्या.

हवामान खात्याने पुढील काही दिवस शहरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पहिल्या पावसाने शहराला गारवा आणि दिलासा दिला असला तरी पावसाळ्यापूर्वीच्या अपुऱ्या तयारीचे वास्तवही पुन्हा एकदा समोर आले आहे.

थोडे नवीन जरा जुने