मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू


 पुणे (वर्षा चव्हाण) : राज्यातील ग्रामीण भागातील पशुपालक, शेतकरी आणि युवकांसाठी दिलासादायक बातमी असून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. पशुसंवर्धन आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलचे तांत्रिक काम अंतिम टप्प्यात असून ते पूर्ण होताच अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे, पशुपालन व्यवसायाला आधुनिक उद्योजकतेचे स्वरूप प्राप्त करून देणे आणि ग्रामीण युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यभरातील युवक, शेतकरी आणि पशुपालकांमध्ये या योजनेबाबत मोठी उत्सुकता आणि सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे.

योजनेची अंमलबजावणी पारदर्शक, सुलभ आणि वेळेत व्हावी यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. लाभार्थ्यांना घरबसल्या अर्ज करता यावा यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार आहे. यासाठी महाआयटीकडून विशेष पोर्टल विकसित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.


डॉ. किरण पाटील यांनी सांगितले की, पोर्टलचे तांत्रिक काम पूर्ण होताच योजनेच्या अधिकृत प्रारंभाची घोषणा करण्यात येईल. त्यामुळे इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची तयारी करून ठेवावी.

योजनेसंदर्भातील अधिकृत माहिती, मार्गदर्शन किंवा शंकानिरसनासाठी लाभार्थ्यांनी टोल-फ्री क्रमांक १९६२ वर संपर्क साधावा, तसेच नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा केंद्राशी संपर्क करून अधिक माहिती घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने