पौष्टिक तृणधान्ये ही आपली पारंपरिक, पोषणमूल्यांनी समृद्ध आणि आरोग्यदायी अन्नसंपदा आहे. मात्र आधुनिक जीवनशैली, बदलती खाद्यसंस्कृती आणि जलद जीवनगती यामुळे तृणधान्यांचा आहारातील वापर दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. परिणामी मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोग, पचनसंस्थेचे विकार यांसारख्या अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, वरई, कोदो, कुटकी, सावा, राजगिरा यांसारख्या पौष्टिक तृणधान्यांचा आहारात पुन्हा समावेश करणे ही काळाची गरज बनली आहे. तृणधान्ये केवळ आरोग्यास लाभदायक नाहीत, तर ती पर्यावरणपूरक आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठीही महत्त्वाची आहेत.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष
भारत सरकारने सन २०१८ हे वर्ष राष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले. यानंतर तृणधान्यांना “पोषक धान्य” किंवा “पोषक तृणधान्ये” अशी ओळख मिळाली. संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे.
या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत ‘महाराष्ट्र श्री अन्न अभियान’ राबविण्यात येत असून, त्यामध्ये तृणधान्य उत्पादन वाढ, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, मूल्यसाखळी विकास व जनजागृती यावर भर देण्यात येत आहे.
‘मिलेट ऑफ द मंथ’ संकल्पना
‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा’च्या अनुषंगाने ‘मिलेट ऑफ द मंथ’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यानुसार—
जानेवारी : बाजरी
फेब्रुवारी : ज्वारी
ऑगस्ट : राजगिरा
सप्टेंबर : राळा
ऑक्टोबर : वरई
डिसेंबर : नाचणी
या उपक्रमांतर्गत राज्यभर विविध कार्यक्रम, कार्यशाळा, प्रदर्शन व जनजागृती मोहिमा राबवून तृणधान्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात येत आहे.
ज्वारी (Sorghum Millets)
ज्वारी हे ग्लुटेनमुक्त तृणधान्य असून त्यामध्ये तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळतात. प्रथिने, थायमिन, नियासिन आणि जीवनसत्त्व बी-६ यांचा हा उत्तम स्रोत आहे. ग्लुटेन असहिष्णुता किंवा आतड्यांच्या विकारांनी त्रस्त व्यक्तींसाठी ज्वारी अत्यंत उपयुक्त आहे.
ज्वारीमध्ये अँटीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असल्यामुळे कर्करोगासह विविध आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. तसेच मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जस्त यांसारखी महत्त्वाची खनिजेही ज्वारीत आढळतात.
बाजरी (Pearl Millets)
बाजरी ही सहज पचणारी व तंतुमय घटकांनी समृद्ध असल्यामुळे तिला ‘सर्वोत्तम अन्नधान्य’ असे म्हटले जाते. वजन नियंत्रणात ठेवणे, रक्तातील मेदाचे प्रमाण कमी करणे आणि मधुमेह नियंत्रणासाठी बाजरी अत्यंत प्रभावी आहे.
बाजरीत कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस ही खनिजे भरपूर प्रमाणात आढळतात. अधिक तंतुमयतेमुळे बाजरीचे पचन मंदगतीने होते व रक्तातील साखरेचे प्रमाण हळूहळू वाढते. त्यामुळे ती मधुमेहींसाठी लाभदायक ठरते. तसेच हृदयाचे आरोग्य राखण्यातही बाजरी महत्त्वाची भूमिका बजावते.
सावा / लघु तृणधान्ये (Little Millets)
सावा, कुटकी, काब्बु, पोन्नी म्हणून ओळखली जाणारी लघु तृणधान्ये आकाराने लहान, गोलसर आणि करड्या-लालसर रंगाची असतात. ही तृणधान्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, जस्त व लोह यांसारख्या खनिजांचा उत्तम स्रोत आहेत.
मॅग्नेशियम हृदयाच्या आरोग्यास पोषक ठरते, तर फॉस्फरस ऊर्जा निर्मिती व वजन नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. लघु तृणधान्यांमध्ये जीवनसत्त्व बी-१, बी-२ आणि बी-६ मुबलक प्रमाणात असून मेद व कॅलरीजचे प्रमाण तुलनेने कमी असते. त्यामुळे आरोग्यदायी आहारासाठी ही तृणधान्ये अत्यंत उपयुक्त आहेत.
संकलन - किशोर थोरात, पिंपरी चिंचवड
