पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन (TQM) विषयावरील चौथी राष्ट्रीय स्तरावरील दोन दिवसीय परिषद भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटरमध्ये उत्साहात पार पडली.
या परिषदेत देशातील आठ राज्यांमधील ३३ उद्योगसमूहांमधून तब्बल ३७८ प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. परिषदेदरम्यान ९७ गुणवत्ता विषयक केस स्टडीज सादर करण्यात आल्या, तर विविध विषयांवरील २० तज्ञांची सत्रे आयोजित करण्यात आली. या माध्यमातून देशभरातील उद्योग प्रतिनिधींमध्ये संपूर्ण गुणवत्ता चळवळीबद्दलची वाढती बांधिलकी अधोरेखित झाली.
परिषदेचे आयोजन सेंटर ऑफ एक्सलन्सच्या वतीने करण्यात आले होते. यजमानपद कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे चॅप्टरने भूषविले. देशभरातील विविध उद्योगक्षेत्रांतील तज्ञ, उच्च पदाधिकारी, विभागप्रमुख, वरिष्ठ अधिकारी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी सक्रिय सहभाग घेतल्याने ज्ञानविनिमयासाठी हे व्यासपीठ समृद्ध ठरले.
परिषदेचे उद्घाटन हुंदाई मोटर्स, पुणे येथील प्लांट हेड श्याम सिंह यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या औद्योगिक अनुभवातून सर्वोत्तम कार्यपद्धतींचे मार्गदर्शन केले. समारोप समारंभ आर. आर. ग्लोबल ग्रुपचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संजीव निमकर यांच्या हस्ते पार पडला. त्यांनी उद्योग क्षेत्रातील संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाबाबत जागतिक दृष्टिकोन मांडला.
यावेळी व्यासपीठावर कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे, राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश मिश्रा, कार्यकारी संचालक डी. के. श्रीवास्तव, सेंटर ऑफ एक्सलन्स विभागाचे सीईओ सुनील श्रीवास्तव तसेच पुणे चॅप्टरचे पदाधिकारी आणि कौन्सिल सदस्य उपस्थित होते.
परिषदेत टाटा मोटर्स, के. के. नाग, थरमॅक्स, सिमेन्स, लूमॅक्स, मदरसन सुमी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, डेलवॉल आणि कमिन्स या अग्रगण्य उद्योगसमूहांतील तज्ञ वक्त्यांनी परिवर्तनकारी कार्यपद्धतींची सविस्तर माहिती उदाहरणांसह मांडली.
जागतिक उद्योगक्षेत्रातील अस्थिरता, अनिश्चितता, गुंतागुंत आणि अस्पष्टता (VUCA) यांचा सामना करण्यासाठीची तयारी, उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची भविष्यातील भूमिका, राष्ट्रीय प्रगतीसाठी कामगारांतील नेतृत्वगुणांचा विकास, तसेच अनुभवातून शिकण्याची संधी या विषयांवर सखोल चर्चा झाली. संघभावनेत वाढ झाल्यास उत्पादकता, उत्पादनाची गुणवत्ता आणि दर्जामध्ये सुधारणा होऊन जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक स्थान कसे मजबूत करता येते, यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
देशभर संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन चळवळ अधिक वेगाने आणि प्रभावीपणे राबवून देशाच्या प्रगतीत धोरणात्मक भागीदार म्हणून उभे राहण्याचा निर्धार उद्योगसमूहांनी या परिषदेत व्यक्त केला.
