नवी दिल्ली (वर्षा चव्हाण) : केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या गायन-वादनाबाबत सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. २८ जानेवारी रोजी काढलेल्या १० पानी आदेशानुसार, आता विशेष सरकारी कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ची संपूर्ण सहा कडवी (अधिकृत आवृत्ती) गायन किंवा वादन करणे अनिवार्य राहणार आहे. या सादरीकरणाचा कालावधी सुमारे ३ मिनिटे १० सेकंद निश्चित करण्यात आला आहे.
यापूर्वी अनेक कार्यक्रमांत फक्त पहिली दोन कडवी गायली जात होती; मात्र नव्या आदेशानुसार सर्व सहा कडव्यांचे सादरीकरण आवश्यक असेल. तसेच ज्या कार्यक्रमांत ‘वंदे मातरम्’ आणि राष्ट्रगान ‘जन गण मन’ दोन्ही सादर केले जातील, तेथे प्रथम ‘वंदे मातरम्’ आणि त्यानंतर ‘जन गण मन’ सादर करणे बंधनकारक राहील. दोन्ही गीतांच्या वेळी उपस्थितांनी सावधान स्थितीत उभे राहून आदर व्यक्त करणे आवश्यक आहे.
# कुठे अनिवार्य?
1. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार पुढील प्रसंगी ‘वंदे मातरम्’चे अधिकृत वादन/गायन अनिवार्य असेल—
2. पद्म पुरस्कारांसारखे नागरी सन्मान समारंभ
3. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणारे औपचारिक राजकीय समारंभ (आगमन व निर्गमनावेळी)
4. राष्ट्रपतींच्या राष्ट्राला उद्देशून संदेशाच्या प्रसारणापूर्वी व नंतर (आकाशवाणी/दूरदर्शन)
5. राज्यपाल/उपराज्यपालांच्या राज्यातील औपचारिक कार्यक्रमांत आगमन व निर्गमनावेळी
6. राष्ट्रीय ध्वज परेडमध्ये (निर्दिष्ट प्रसंगी)
7. राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभ
8. महत्त्वाचे शासकीय सांस्कृतिक कार्यक्रम व मंत्र्यांच्या उपस्थितीतील प्रमुख समारंभ
9. सरकारच्या आदेशाने आयोजित शालेय कार्यक्रम
10. तसेच भारत सरकारने विशेष आदेश दिलेल्या इतर प्रसंगीही राष्ट्रगीताचे वादन करणे अपेक्षित आहे.
🔹कुठे अनिवार्य नाही?
1. मंत्रालयाने काही ठिकाणी अपवादही स्पष्ट केले आहेत—
2. चित्रपटगृहांत ‘वंदे मातरम्’ अनिवार्य नाही.
3. चित्रपटाच्या दृश्याचा भाग म्हणून गीत वाजल्यास प्रेक्षकांनी उभे राहणे बंधनकारक नाही.
4. खासगी, धार्मिक किंवा सामाजिक समारंभांत सक्ती नाही.
5. अनौपचारिक बैठकींमध्येही अनिवार्यता नाही.
6. सरकारच्या मते, चित्रपटगृहांत सक्ती केल्यास गोंधळ किंवा अव्यवस्था निर्माण होऊ शकते.
# सादरीकरणाची पद्धत
1. अधिकृत आवृत्तीचीच सहा कडवी गायन/वादन करणे आवश्यक.
2. कालावधी: सुमारे ३ मिनिटे १० सेकंद.
3. बँडसह सादरीकरण असल्यास प्रारंभी विशिष्ट संकेत (बिगुल/मृदंग) देण्यात येईल.
4. सामूहिक गायनाच्या वेळी योग्य ध्वनीव्यवस्था व गीताची लिखित प्रत उपलब्ध करून देण्याची सूचना.
5. सर्व शाळांमध्ये दिवसाची सुरुवात राष्ट्रगीताच्या सहगानाने करण्याची शिफारस.
# ‘वंदे मातरम्’चा इतिहास
‘वंदे मातरम्’ हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी १८७५ साली संस्कृत-बंगाली मिश्र भाषेत लिहिले. ते प्रथम ‘बंगदर्शन’ नियतकालिकात प्रकाशित झाले आणि नंतर १८८२ मधील ‘आनंदमठ’ कादंबरीत समाविष्ट करण्यात आले. पुढे स्वातंत्र्यलढ्यात या गीताने प्रेरणादायी भूमिका बजावली. भारताने ‘जन गण मन’ला राष्ट्रगानाचा दर्जा दिला असला तरी ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताचा मान आहे.
# आदेशाचा उद्देश
गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रगीताच्या सादरीकरणात एकरूपता, शिस्त आणि आदरभाव राखणे हा या नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा मुख्य उद्देश आहे. अधिकृत कार्यक्रमांमध्ये ठरावीक प्रोटोकॉलनुसार ‘वंदे मातरम्’ सादर करून राष्ट्रभावना दृढ करण्यावर सरकारचा भर आहे.
नव्या आदेशामुळे आता सर्व शासकीय कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’चे सहा कडव्यांसह सादरीकरण निश्चित कालावधीत केले जाणार असून, राष्ट्रगीताबाबतचा अधिकृत प्रोटोकॉल अधिक स्पष्ट झाला आहे.
