MGID Header Code
Code End

चिंचवडमध्ये ७०० गणेशभक्तांचे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

 

ऋषिपंचमीनिमित्त मंगलमूर्ती वाड्यात भक्तिमय वातावरण; महिला-पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग

पिंपरी चिंचवड (शिवानंद चौगुले) “ओम् नमस्ते गणपतये…”, “ओम गं गणपतये नमः…”, “गजानना, गजानना…” आणि “मोरया, मोरया…” अशा गणेश नामाच्या जयघोषाने ऋषिपंचमीनिमित्त मंगळवारी सकाळी मंगलमूर्ती वाडा परिसर भक्तिमय झाला. संस्कृती संवर्धन व विकास महासंघ आणि चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने सकाळी सात वाजता सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले होते. महिला व पुरुष मिळून सुमारे ७०० गणेशभक्तांनी या सामुदायिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात सौ. अपर्णा रत्नपारखी व सहकाऱ्यांच्या केशव शंखनाद पथकाच्या मंगलमय शंखनादाने झाली. त्यानंतर श्री. अनिल आढी, सौ. अपर्णा कुलकर्णी, श्रीमती प्रिया जोग आणि सौ. नेहा मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. शेकडो गणेशभक्तांनी एकसुरात अथर्वशीर्षाचे पठण केल्याने संपूर्ण मंगलमूर्ती वाडा परिसरात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा सुरेल संगम अनुभवायला मिळाला.

महिला आणि पुरुष गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत गणेश नामस्मरण, अथर्वशीर्ष पठण आणि सामूहिक उपासनेचा आनंद घेतला. धार्मिक परंपरा व संस्कृतीचे संवर्धन, सामूहिक भक्तीची भावना वृद्धिंगत करणे आणि समाजात एकात्मतेचा संदेश पोहोचविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

यावेळी गायत्री परिवाराच्या वतीने गायत्री गणेश यागाचे आयोजन करण्यात आले. वैदिक मंत्रोच्चार, यज्ञविधी आणि अथर्वशीर्ष पठणामुळे कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक वातावरण लाभले. गायत्री परिवाराच्या अनेक सदस्यांनी यामध्ये सहभाग घेतला.

कार्यक्रमास डॉ. अभय कुलकर्णी, श्री. नरहरी वाघ, श्री. नारायण देशपांडे, श्री. शांताराम दामगुडे, नगरसेवक श्री. सुरेश भोईर, सौ. मनीषा चिंचवडे, सौ. अपर्णा डोके, ह.भ.प. किसन महाराज चौधरी, श्री. हरीभाऊ क्षीरसागर, श्री. सुभाष चव्हाण, डॉ. अजित जगताप, सौ. माधुरीताई कवी, श्रीमती अश्विनीताई नाटेकर, श्रीमती अंजलीताई कुलकर्णी, श्रीमती प्रियाताई जोग, सौ. दीपाली खासनिस, सौ. मंजिरी गोडबोले, सौ. सुषमाताई वैद्य, श्री. यशवंत देशपांडे, श्री. सोमनाथ बारपांडे, श्री. शिवानंद चौगुले, श्री. विकास देशपांडे, श्री. संतोष साहू, सौ. ज्योतीताई कानिटकर यांच्यासह विविध भजनी मंडळांचे सदस्य आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. अजित जगताप यांनी प्रास्ताविक केले. ह.भ.प. किसन महाराज चौधरी यांनी आभार मानले. सामुदायिक अथर्वशीर्ष पठणानंतर श्री गणेशाची आरती करण्यात आली. चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि श्री गजानन सत्संग मंडळ, चिंचवड यांच्या सहकार्याने उपस्थित गणेशभक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रसादवाटपाने या भक्तिमय कार्यक्रमाची सांगता झाली.

वार्ताहर : शिवानंद चौगुले

महाराष्ट्र जनभूमी न्यूज

थोडे नवीन जरा जुने