PCMC : १२ फेब्रुवारीच्या देशव्यापी संपात कामगारांनी सहभागी व्हावे – काशिनाथ नखाते




पिंपरी चिंचवड : देशभरातील तसेच राज्यातील कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या चार नव्या श्रमसंहिता केंद्र सरकारने नोव्हेंबर महिन्यात लागू केल्या आहेत. या श्रमसंहितांमुळे कामगारांच्या हक्कांवर गदा आली असून कामाचे तास ८ वरून १२ तासांपर्यंत वाढविण्यात आल्याचा आरोप कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केला. या धोरणांच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील सर्व कामगारांनी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या देशव्यापी संपात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

कर्मचारी संघटना कृती समिती महाराष्ट्र, कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, कष्टकरी रिक्षा-टॅक्सी महासंघ आणि कामगार महासंघ यांच्या वतीने आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, मनपा समिती सदस्य किरण साडेकर, सदस्य राजू बिराजदार, निमंत्रक बालाजी लोखंडे, सुनील भोसले, नंदू आहेर, कमल लष्करे, सुनीता दिलापाक, वत्सला जाधव, निर्मला कुंभार, अनिता देसाई, अर्चना कांबळे आदी उपस्थित होते.

राज्यातील कामगारांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असून कायमस्वरूपी कामगारांना हंगामी स्वरूपात आणण्याचे प्रयत्न या कायद्यांद्वारे होत आहेत. तसेच संघटना कमकुवत करण्याचाही प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याचा आरोप नखाते यांनी केला. भांडवलधार्जिण्या धोरणांमुळे कामगारांना संकटात ढकलले जात असल्याने १२ फेब्रुवारीच्या संपात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने