MGID Header Code
Code End

घोरावडेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद


घोरावडेश्वर (ता. मावळ - शिवानंद चौगुले) – महाशिवरात्री निमित्त मोठ्या संख्येने भाविकांनी घोरावडेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी हजेरी लावली होती. मात्र दर्शनानंतर डोंगर परिसरात प्लास्टिकच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, रॅपर व इतर कचऱ्याचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळून आला.

या पार्श्वभूमीवर शिवजयंती निमित्त स्थानिक युवकांनी स्वच्छता अभियान राबवत सुमारे २००० प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या डोंगरावरून गोळा करून खाली आणल्या.

या मोहिमेत श्री रवि मनकर व श्री मणेश म्हस्के यांनी मोलाचे योगदान देत प्रत्यक्ष डोंगर चढ-उतार करत प्लास्टिक कचरा संकलित केला. त्यांच्यासह काही स्वयंसेवकांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. डोंगरमाथ्यावर आणि पायवाटांवर विखुरलेला कचरा गोळा करताना स्वयंसेवकांना मोठी मेहनत घ्यावी लागली.

कार्यकर्त्यांच्या माहितीनुसार, संकलित करण्यात आलेला कचरा हा एकूण प्लास्टिकपैकी केवळ ३५ ते ४० टक्के आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक डोंगर परिसरात विखुरलेले असून, ते गोळा करण्यासाठी पुढील काही दिवसांत आणखी मोहिमा राबविण्यात येणार आहेत.

स्वच्छता मोहिमेद्वारे भाविकांना पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला –

“देवदर्शनास येताना श्रद्धेसोबत स्वच्छतेची जबाबदारीही पार पाडावी.”

शक्यतो प्लास्टिकचा वापर टाळून स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या व कापडी पिशव्या वापराव्यात. प्लास्टिक साहित्य सोबत आणलेच तर ते डोंगरावर किंवा परिसरात न टाकता पुन्हा खाली आणून कचराकुंडीत टाकावे, असे आवाहन करण्यात आले.

घोरावडेश्वर डोंगर हा निसर्गरम्य व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा परिसर असून येथे दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. मात्र वाढत्या प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने येथे कचरा व्यवस्थापनासाठी अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

शिवजयंतीच्या निमित्ताने पार पडलेल्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत असून, “स्वच्छ डोंगर – हरित डोंगर” हा संदेश अधिक व्यापक करण्याची गरज व्यक्त होत आहे.

थोडे नवीन जरा जुने