पिंपरी चिंचवड (शिवानंद चौगुले) – “सर्वांना समानतेने बघण्याचे तत्व म्हणजेच हिंदुत्व” असे प्रतिपादन इतिहास संशोधक प्रसाद बोराडे यांनी केले. कृष्णानगर परिसरातील हनुमान मंदिर सभागृहात आयोजित हिंदू संमेलनात ते बोलत होते.
यावेळी त्यांनी सांगितले की, हिंदू धर्मामध्ये सर्वांना समानतेने वागवण्याचे तत्व प्रभू श्रीरामचंद्र व छत्रपती शिवाजी महाराज यांनी आचरणात आणले. तोच वारसा आजही जोपासला जात आहे. मात्र मागील काही काळात इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला गेला असल्याने खरा इतिहास जाणून घेऊन हिंदूंनी संघटन अधिक मजबूत करण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.
संस्कृती संवर्धन विकास मंचचे अध्यक्ष ह.भ.प. किसनजी महाराज यांनी आपल्या आशीर्वचनात भारतीय संस्कृतीची महानता विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्ती निमित्त विविध वस्त्यांमध्ये हिंदू संमेलन आयोजित करण्यात येत असून, या माध्यमातून हिंदू संघटन व कुटुंब प्रबोधन दृढ करण्यासाठी “पंच परिवर्तन” संकल्पनेचे महत्त्व असल्याचे पिंपरी चिंचवड कुटुंब प्रबोधन जिल्हाप्रमुख श्रीराम कुलकर्णी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमान मंदिर ट्रस्टचे सचिव आप्पाजी सायकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रवीण कोठावदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अभिषेक भोज यांनी मानले. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवानंद चौगुले व कृष्णानगर-फुलेनगर परिसरातील स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
या संमेलनास मोठ्या संख्येने हिंदू बांधव व भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली असून उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आले.
