!-- afp header code starts here --> शिवचरित्रातून राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा : निगडीत शिवजयंती विशेष व्याख्यान

शिवचरित्रातून राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा : निगडीत शिवजयंती विशेष व्याख्यान


निगडी (शिवानंद चौगुले) : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासिका’तर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यान उत्साहात पार पडले. प्राधिकरण सेक्टर २५ येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनमधील कॅप्टन जी. एस. कदम सभागृहात हा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख वक्ते डॉ. अजित जगताप (एम.एस्सी., पीएच.डी., एन.डी.) यांनी “शिवचरित्र – जीवनाचे पथदर्शक” या विषयावर मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभारताना परिस्थितीनुसार योग्य नीतीचा अवलंब केला. औपचारिक महाविद्यालयीन शिक्षण नसतानाही त्यांनी स्वराज्य उभे केले. यामागे मातोश्री जिजाबाई यांनी दिलेले संस्कार, नैतिक मूल्ये आणि राष्ट्रभक्तीचे बाळकडू हेच त्यांच्या कार्याचे खरे सामर्थ्य होते, असे त्यांनी सांगितले.

शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्यांचे शिक्षण आत्मसात करणे गरजेचे आहे. बालपणीच हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करून आवश्यक गुण अंगीकारल्यामुळेच शिवरायांना यश मिळाले. समाजजीवनात शिवरायांचे विचार स्वीकारल्यास राष्ट्रनिर्मितीला नवी दिशा मिळू शकते. युवकांनी शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन आपले व्यक्तिमत्त्व घडवावे, असे आवाहन डॉ. जगताप यांनी केले.

तसेच शिवरायांनी विविध प्रसंगांत वापरलेली नीती व प्रभू रामचंद्रांचे आदर्श जीवन यांचा विचार केल्यास समाज आणि राष्ट्रजीवन अधिक उंचीवर नेता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. जगताप यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राष्ट्रीय विचार समाजात रुजविण्यासाठी दर महिन्याला अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाची प्रस्तावना सोनाली यांनी केली. सूत्रसंचालन प्रगती पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजय राठोड यांनी मानले. घोषणांचे काम प्रमोद यांनी पाहिले. रांगोळी दिव्या, प्रिया, शालिनी, माधुरी व मानसी यांनी साकारली. स्वागत व कार्यक्रमाच्या तयारीसाठी स्वामी, ज्ञानेश्वर आणि रोहित यांनी परिश्रम घेतले.

या प्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासिकेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अनेक मान्यवरांसह मंडळाचे सहसचिव शिवानंद चौगुले उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त आयोजित या व्याख्यानातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, नैतिक मूल्ये आणि शिवचरित्रातून प्रेरणा घेण्याचा संदेश देण्यात आला.

थोडे नवीन जरा जुने