PCMC : बेशिस्त कारभाराचा बळी : केबल जंजाळाने घेतला निष्पाप जीव



पिंपरी चिंचवड (शिवानंद चौगुले): पिंपरी-चिंचवड शहरातील प्रशासनाच्या ढिसाळ आणि बेफिकीर कारभारामुळे आणखी एक निष्पाप जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे आजीव सदस्य श्री. संदीप पटवर्धन यांच्या पत्नी व महिला विभागाच्या कोषाध्यक्षा कै. सौ. संपदा संदीप पटवर्धन यांचे मंगळवार, 28 एप्रिल 2026 रोजी पहाटे दुःखद निधन झाले. तीन दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर डॉक्टरांनी अथक प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, घरातून स्कूटरवर बाहेर पडताना रस्त्यावर बेशिस्तपणे लटकत असलेल्या इंटरनेट/केबल वायरमध्ये त्यांचा गळा अडकला. यामुळे त्या जोरात खाली कोसळल्या व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तीन दिवस जीवन-मरणाशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. हा अपघात नसून थेट प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडलेला ‘मृत्यू’ असल्याचा संतप्त आरोप नागरिकांतून होत आहे.

शहरभर सुरू असलेली अनियंत्रित बांधकामे, रस्त्यांवर सैलपणे टाकलेल्या इंटरनेट, वाय-फाय आणि डिशच्या केबल्स यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. कोणतेही नियम न पाळता, कोणतीही देखरेख न ठेवता हे जाळे अक्षरशः रस्त्यावर पसरलेले आहे. वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाची उदासीनता पुन्हा एकदा उघड झाली आहे.

विशेष म्हणजे, ही दुर्घटना महापालिकेच्या उपमहापौरांच्या वार्डातच घडल्याने परिस्थितीची गंभीरता अधिकच अधोरेखित होते. नागरिकांच्या सुरक्षेबाबत जबाबदार असलेले प्रशासनच निष्क्रिय ठरत असेल, तर सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

कै. सौ. संपदा पटवर्धन यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र, या घटनेनंतर तरी प्रशासन जागे होणार का? की आणखी निष्पाप जीवांचा बळी घेतल्यानंतरच कारवाई होणार? असा जाब आता पिंपरी-चिंचवडकर विचारत आहेत.

ही घटना केवळ एक अपघात नसून, बेशिस्त आणि बेजबाबदार व्यवस्थेचा थेट परिणाम आहे. दोषींवर कठोर कारवाई करून शहरातील केबल जंजाळ तात्काळ हटविण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.




थोडे नवीन जरा जुने