पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शिवरायांचा जिवंत इतिहास रंगमंचावर.
पिंपरी चिंचवड - महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन आणि मराठी राजभाषा दिन या तिन्ही महत्त्वपूर्ण दिवसांचे औचित्य साधत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जाणता राजा’ या भव्य महानाट्याला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद खरोखरच अभिमानास्पद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श नेतृत्व, दूरदृष्टी आणि जनकल्याणकारी विचार या महानाट्याच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणे आणि याद्वारे समाजाला प्रेरणा देणे हा यामागचा मानस असल्याचे मत महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केले तसेच या भव्य महानाट्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व नागरिकांचे त्यांनी आभार मानले.
महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन तसेच मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत महापालिकेच्या वतीने निगडी प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदान येथे आयोजित करण्यात आलेले ‘जाणता राजा’ हे भव्य ऐतिहासिक महानाट्य उत्साहात आणि दिमाखात पार पडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचे प्रभावी सादरीकरण अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
यावेळी आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, नगरसदस्या शैलजा मोरे, नगरसदस्य अमित गावडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर रवि लांडगे यावेळी म्हणाले, महाराष्ट्र दिन हा आपल्या राज्याच्या अस्मितेचा, इतिहासाचा आणि प्रगतीचा अभिमान बाळगण्याचा दिवस आहे. त्याचप्रमाणे, जागतिक कामगार दिन आपल्याला कष्टकरी वर्गाच्या योगदानाची जाणीव करून देतो. उद्योग, विकास आणि शहरांची उभारणी ही कामगारांच्या अथक परिश्रमांवर उभी आहे. याशिवाय, मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि विचारांची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य आपल्याला आदर्श नेतृत्व, दूरदृष्टी आणि जनकल्याणाची प्रेरणा देते. ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून ही प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे. आज नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक कलाकृतीला दिलेला प्रतिसाद अभिमानास्पद असल्याचेही महापौर रवि लांडगे यावेळी म्हणाले.
आमदार उमा खापरे यावेळी म्हणाल्या, ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवंत इतिहास अनुभवण्याची संधी आज मिळाली, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. शिवरायांचा पराक्रम, दूरदृष्टी आणि जनकल्याणकारी विचार प्रत्येकाच्या मनात घर करून राहिले आहेत आणि हे महानाट्य त्या प्रेरणेला अधिक दृढ करते.
तसेच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देताना आपल्या राज्याच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान बाळगणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तसेच, जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकरी वर्गाला माझा मनःपूर्वक सलाम. पिंपरी-चिंचवड ही कामगारांची नगरी म्हणून ओळखली जाते आणि या शहराच्या विकासात कामगारांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असेही आमदार उमा खापरे यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, महाराष्ट्र कीर्ती सोहळा प्रतिष्ठान आयोजित आणि पद्मभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित व दिग्दर्शित आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाचे ऐतिहासिक ‘जाणता राजा’ या महानाट्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा भव्य, जिवंत आणि प्रेरणादायी पट उलगडला. शेकडो कलाकार, नेत्रदीपक नेपथ्य, वास्तवदर्शी युद्धदृश्ये, पारंपरिक वेशभूषा आणि प्रभावी प्रकाशयोजना यांमुळे हे महानाट्य प्रेक्षकांना इतिहासाचे साक्षीदार बनवले. स्वराज्याची स्थापना, आदर्श शासनव्यवस्था, शौर्य, कर्तृत्व आणि जनकल्याणकारी दृष्टिकोन या सर्व पैलूंना प्रभावीपणे उलगडत ‘जाणता राजा’ हे केवळ नाट्यप्रयोग न राहता एक संस्कारमंच ठरले.
