पिंक रिक्षा योजनेत ४०० कोटींचा महाघोटाळा; ५ मे रोजी 'ग्रीन कॅनेटी' कंपनीवर महिलांचा रिक्षासह धडक मोर्चा!


शासनाची फसवणूक अन् कष्टकरी महिलांची लूट; भ्रष्ट कंपनी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताविरोधात एल्गार!

L-5 टेंडरमध्ये L-3 चे 'भंगार' माथी मारले; डॉ. बाबा कांबळे यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा.

१० हजार रिक्षांची योजना, केवळ १३७ रस्त्यावर! प्रकरणाची ACB चौकशी करण्याची 'महाराष्ट्र रिक्षा पंचायत'ची मागणी.

पुणे / पिंपरी: महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या 'पिंक ई-रिक्षा' योजनेत सुमारे ४०० कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायत व पिंक रिक्षा महिला चालक-मालक संघटनेने केला आहे. या भ्रष्टाचाराविरोधात आणि फसवणूक झालेल्या भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी मंगळवार, ५ मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते 'ग्रीन कॅनेटी' (Green Kinetic) कंपनीपर्यंत भव्य धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी दिली.

घोटाळ्याचा पर्दाफाश: तांत्रिक फसवणूक आणि आर्थिक लूट
डॉ. बाबा कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या घोटाळ्याचे स्वरूप स्पष्ट केले आहे:

L-5 ऐवजी L-3 चा कचरा: मूळ टेंडरनुसार आधुनिक आणि वेगवान L-5 श्रेणीतील रिक्षा देणे बंधनकारक होते. मात्र, कंपनीने चक्क L-3 (जुने व्हर्जन) रिक्षा महिलांच्या माथी मारल्या. या रिक्षांचा वेग केवळ २५-३० किमी असून आरटीओच्या नियमानुसार यांना शहरी भागात व्यावसायिक प्रवासी वाहतुकीस बंदी आहे. ज्या रिक्षा व्यवसायच करू शकत नाहीत, त्या देऊन महिलांना कर्जबाजारी करण्यात आले आहे.

दुप्पट भावाने वसुली: ज्या L-3 रिक्षांची बाजारभावानुसार किंमत १.२० लाख ते २ लाख रुपये आहे, त्या रिक्षा महिला बालकल्याण विभाग आणि कंपनीने संगनमत करून चक्क ४ लाख रुपयांना विकल्या आहेत.

योजनेचा फियास्को: १०,००० रिक्षांचे उद्दिष्ट असताना आज केवळ १३७ रिक्षा रस्त्यावर आहेत. निकृष्ट दर्जामुळे या गाड्या वारंवार बंद पडत असून महिलांचे आर्थिक नुकसान होत आहे.

आंदोलनाची रणनीती:
५ मे रोजी होणाऱ्या या मोर्चात फसवणूक झालेल्या महिला स्वतःच्या नादुरुस्त रिक्षांसह सहभागी होणार आहेत. पिंपरीतील 'ग्रीन कॅनेटी' कंपनीच्या शोरूमवर हे आंदोलन केले जाईल. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असा पवित्रा संघटनेने घेतला आहे.

आमच्या प्रमुख मागण्या:

१. ACB चौकशी: ४०० कोटींच्या या घोटाळ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) सखोल चौकशी व्हावी.

२. रक्कम व्याजासह परत: निकृष्ट L-3 रिक्षा तात्काळ परत घेऊन महिलांचे ४ लाख रुपये व्याजासह परत मिळावेत.

३. फौजदारी गुन्हे (FIR): आर्थिक फसवणूक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी कंपनी मालकांवर तात्काळ FIR दाखल करावा.

४. २ लाख रुपये थेट अनुदान: नवीन L-5 योजनेसाठी महिलांना सरसकट २ लाख रुपये अनुदान द्यावे.

५. वरिष्ठ समितीची स्थापना: महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय समिती स्थापन करून त्यात संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश करावा.

सहभागाचे आवाहन:
या अन्यायाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पिंक महिला रिक्षा चालक संघ आणि रिक्षा ब्रिगेड मोठ्या ताकदीने उतरणार आहे. पीडित महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

आपला नम्र,

डॉ. बाबा कांबळे
संस्थापक अध्यक्ष - महाराष्ट्र रिक्षा पंचायत
संपर्क: भक्ती कॉम्प्लेक्स, खराळवाडी, पिंपरी चिंचवड, पुणे - ४१०१८.

दिनांक: ५ मे २०२६

वेळ: सकाळी ११:०० वाजता

स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, पिंपरी.

थोडे नवीन जरा जुने