धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ‘स्टॅच्यु ऑफ हिंदुभूषण’ येथे भव्य प्रकाशोत्सव


- दोन दिवस चालणार ऐतिहासिक लाईट शो, शस्त्र प्रदर्शन

- हिंदूभूषण स्मारक ट्रस्टच्या पुढाकाराने अनोखे अभिवादन

पिंपरी-चिंचवड : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बोऱ्हाडेवाडी-मोशी येथील स्टॅच्यु ऑफ हिंदुभूषण येथे हिंदुभूषण स्मारक ट्रस्टच्या वतीने भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. १४ मे व शुक्रवार दि. १५ मे २०२६ या दोन दिवसांत होणाऱ्या या विशेष सोहळ्यात हिंदुस्थानच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय लाईट शो, आकर्षक विद्युत रोषणाई आणि शिवकालीन वैभवाचे दर्शन घडविणारे विविध उपक्रम सादर करण्यात येणार आहेत.

सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत होणाऱ्या विशेष लाईट शोमध्ये धर्मवीर शंभूराजेंच्या पराक्रमाचा, त्यागाचा आणि स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाचा इतिहास आधुनिक प्रकाशयोजना, ध्वनी आणि दृश्य माध्यमांच्या सहाय्याने साकारण्यात येणार आहे. संपूर्ण परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असून, ‘स्टॅच्यु ऑफ हिंदुभूषण’ परिसर भगव्या प्रकाशाने उजळून निघणार आहे. शिवप्रेमींसाठी हा सोहळा विशेष आकर्षण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

हिंदुभूषण स्मारक ट्रस्टतर्फे “धर्मवीर शंभूराजेंना अनोखी मानवंदना” या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम इतिहासात पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, धर्मरक्षणासाठी दिलेले बलिदान आणि हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी केलेले संघर्ष यांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पिंपरी चिंचवडसह पुणे परिसरातील हजारो शिवप्रेमी या सोहळ्यास उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून धर्मवीर शंभूराजेंच्या तेजस्वी इतिहासाचा जागर करावा, असे आवाहन हिंदुभूषण स्मारक ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

गुरुवार दि. १४ मे रोजी सकाळी ठिक ८ वाजता धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक व विधिवत पूजाअर्चा करण्यात येणार आहे. यावेळी विविध धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि पारंपरिक पद्धतीने अभिषेक सोहळा पार पडणार आहे. शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराजांना अभिवादन करणार आहेत. तसेच सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत भव्य दिव्य ऐतिहासिक शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये तलवारी, ढाली, भाले, कट्यारी, तोफा तसेच शिवकालीन युद्धसामग्रीचे विविध प्रकार नागरिकांना पाहायला मिळणार आहेत. शिवकालीन युद्धकला, शस्त्रांचे महत्त्व आणि मराठा साम्राज्याच्या लढाऊ परंपरेची माहिती देखील या प्रदर्शनातून दिली जाणार आहे. इतिहास अभ्यासक, शिवव्याख्याते आणि तरुण पिढीसाठी हे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरणार आहे.

प्रतिक्रिया : 

“धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि धर्मरक्षणासाठीचे बलिदान हे संपूर्ण हिंदुस्थानासाठी प्रेरणादायी आहे. नव्या पिढीला शंभूराजेंचा तेजस्वी इतिहास समजावा आणि स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ‘स्टॅच्यु ऑफ हिंदुभूषण’ येथे भव्य लाईट शो, विद्युत रोषणाई आणि शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मवीर शंभूराजेंना अभिवादन करावे,”

महेश लांडगे, अध्यक्ष, हिंदूभूषण स्मारक ट्रस्ट.

थोडे नवीन जरा जुने